नवी दिल्ली - काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेस सुप्रिमो सोनिया गांधी यांना पत्र लिहून कपिल सिब्बल यांना एकप्रकारे समर्थनच दिलं आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या विधानामुळे युवक काँग्रेस नाराजी झाली असून त्यांनी सिब्बल यांच्या घरासमोर निषेध व्यक्त केला. या घटनेवरुन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आनंद शर्मा यांनी ट्विट करत कपिल सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच, सिब्बल यांच्या घराबाहेर सुरू असलेली गुंडागर्दी आणि हल्ल्याचे वृत्त त्रासदायकआहे. याप्रकारची कृती पक्षाला बदनाम करते, आणि निषेधार्ह आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारा काँग्रेस पक्ष आहे. विभिन्न विचार हेच राजकीय लोकशाहीची निशाणी आहे. असहिष्णुता आणि हिंसा हे काँग्रेसच्या विचाराविरुद्ध आहे. त्यामुळेच, वरील घटनेला जे जबाबदार आहेत, त्यांच्याविरुद्ध पक्षाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही आनंद शर्मा यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी सोनिया गांधींना उद्देशून ट्विट केलं आहे.
पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने निर्णायकी स्थिती
काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्णायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पक्षाचे आणखी एक नेते मनीष तिवारी यांनीही अशाच आशयाचे विधान केले होते. अमरिंदर यांचा राजीनामा घेताना, नवा मुख्यमंत्री ठरवताना पक्षात चर्चा झाली नाही, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जणांनी पदे सोडली, पण पक्ष गप्पच आहे. अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची लगेच बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.
गुलाब नबी आझाद यांचं सोनियांना पत्र
कपिल सिब्बल यांनी दिल्लीत माध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी करत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षच नसताना निर्णय कोण घेतो, अशी विचारणा केली. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, त्यांनीही काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते त्या २३ नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या नेत्यांच्या गटाला जी-२३ असेही संबोधले जाते.