पाटणा - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळक बातम्यांमध्ये असताना बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी घमासान सुरू आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपासोबत युतीची घोषणा करू शकतात. त्यामुळे, महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. अद्याप यासंदर्भात कुठलेही अधिकृत विधान बड्या नेत्याने केले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका विधानाने राजकीय सत्तांतराचं 'वॉर' सुरू असल्याचं दिसून येत आहे.
बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. मात्र, कुठल्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमताचा आकडा नसल्याने हा सामना अटीतटीचा असल्याचे दिसून येते. त्यातच, पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यातच, तेजस्वी यादव यांनीही अप्रत्यक्षपणे नितीशकुमारांना इशाराच दिला आहे. सहजरित्या सत्तांतर होऊ देणार नाही, व इतक्या सहजपणे पुन्हा एकदा सत्तेचा मुकूट परिधान करु देणार नाही, असे विधान तेजस्वी यादव यांनी केले आहे. त्यामुळे, बिहारच्या राजकीय भूकंपावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाला आहे. तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्यावर मध्यरात्री १ वाजता आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले असण्याची शक्यता आहे. आरजेडीकडून दलित चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरजेडीचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनाही नितीशकुमार यांनी भेट न दिल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
ममता बॅनर्जी यांनीही दिली प्रतिक्रिया
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या.