राजधानी दिल्लीपासून जवळ असलेल्या गाझियाबादमध्ये सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. दहा वर्षांचा एक मुलगा ५० मिनिटं लिफ्टमध्ये अडकला होता. या दरम्यान त्यानं लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
गाझियाबादच्या राजनगर एक्सटेंशनच्या केडब्ल्यू सृष्टी सोसायटीच्या डी टॉवरमध्ये राहणारा ईवान त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी जी टॉवरमध्ये जात होता. ईवान १२ व्या मजल्यावर जाताच लिफ्ट बंद पडली. त्यामुळे ईवान अस्वस्थ झाला. त्यानं लिफ्टमधून बाहेर पडण्याचे बरेच प्रयत्न केले. थोड्या वेळानं त्याचा श्वास कोंडू लागला. त्यामुळे त्यानं स्वत:चे कपडे काढले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
बऱ्याच प्रयत्नानंतर ईवानला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र या घटनेचा जबर मानसिक धक्का त्याला बसला आहे. तो आता लिफ्टचा वापर करण्यास घाबरतो. या प्रकरणी ईवानचे वडील गौरव शर्मा यांनी लिफ्टच्या देखभालीचं काम पाहणाऱ्या कंपनीविरोधात नंदग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित कुमार यांनी दिली.
लिफ्ट बंद पडताच ईवाननं इंटरकॉम आणि अलार्मच्या मदतीनं संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र दोन्ही यंत्रणा काम करत नव्हत्या. लिफ्टच्या सीसीटीव्हीकडेही कोणाचंच लक्ष नव्हतं. सोसायटीच्या देखरेख विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा मुलाच्या जीवावर बेतला असता, अशा शब्दांत ईवानच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. लिफ्टमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ईवानच्या हाताला अनेक ठिकाणी जखमा झाल्याचं त्यांनी सांगितलं.