आजकाल तरुणांना रील्स बनवण्याचं इतकं वेड लागलं आहे की, ते जीव धोक्यात घालतात. तसेच अनेकवेळा मोठ्या अपघाताला बळी पडतात. गाझियाबादच्या इंदिरापुरममधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक १६ वर्षांची मुलगी रील बनवताना सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडली. यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे प्रकरण गाझियाबादच्या इंदिरापुरम भागातील क्लाउड सोसायटीशी संबंधित आहे. १६ वर्षांची मोनिषा आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभी राहून मोबाईलने रिल काढत होती. ती रील बनवत असताना अचानक तिचा मोबाईल तिच्या हातून निसटला आणि तो पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच मोनिषा थेट बाल्कनीतून खाली पडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोनिषा खाली पडल्यानंतर मोठ्या संख्येने लोक जमले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये ती गंभीर जखमी झालेली दिसत आहे. ती स्वतःच रुग्णवाहिका बोलवण्याबद्दल सांगत आहे. मुलगी वरून गंभीर जखमी झाली. जवळच उभ्या असलेल्या वाहनातून तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर मुलीचे कुटुंब राहते.
मुलगी वरून खाली पडल्यावर घरातील लोकही धावतच खाली आले, मोनिषाची प्रकृती गंभीर असून तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डीसीपी ट्रान्स हिंडन निमिष पाटील यांनी सांगितलं की, इंदिरापुरम येथील क्लाउड ९ सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावरून एक मुलगी पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.