मथूरा – उत्तर प्रदेशच्या मथूरा गाजियाबाद येथे महंत नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कोरोना महामारी हे सरकारचं षडयंत्र आहे. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जातंय असा दावा नरसिंहानंद यांनी केला आहे. मी ना मास्क लावणार ना कोरोना आहे असं मानणार असं अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकचं नाही तर भारतात मुस्लिमांची वाढती संख्या हिंदूंच्या विनाशाचं कारण बनणार असल्याचा वादग्रस्त दावाही त्यांनी केला.
ज्यांची इम्युनिटी कमी तेच मास्क लावतात
गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मथुरा येथे पोहचले होते. त्यांनी संतांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोरोनावरून सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मास्क लावण्याचा आग्रह करून सरकार लोकांना आजारी पाडत आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. मी मास्क लावत नाही. कोरोना आहे असं मला वाटत नाही. ज्यांची इम्युनिटी क्षमता कमी आहे. ते लोक मास्क लावतात असं त्यांनी सांगितले.
मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास
मी मास्क घालत नाही कारण मला माझ्या इम्युनिटीवर विश्वास आहे. मी कोरोनाला मानत नाही. ज्यांची इच्छाशक्ती कमी अथवा कमकुवत आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत तेच लोक कोरोनामुळे मृत्यू पावत आहेत. माझे सर्व माझ्या सोबत आहे असंही नरसिंहानंद म्हणाले.
तर गुरुवारी गोवर्धन परिक्रमा येथील रमणरेती आश्रमातील कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केले. भारतात मुस्लिमांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. ज्याठिकाणी मुस्लिमांची संख्या वाढली आहे त्याठिकाणी ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. हिंदू नेत्यांवर भरवसा ठेऊ नका. प्रत्येक हिंदूने कमीत कमी ५ ते ६ मुलांना जन्म द्यायला हवा. ज्यारितीने मुस्लिमांची संख्या वाढतेय ते पाहता महाविनाश होऊ शकतो. प्रत्येक हिंदूला शस्त्रधारी बनण्याची आवश्यकता आहे असंही महंत नरसिंहानंद सरस्वती म्हणाले.
नरसिंहानंदांची वादग्रस्त मालिका
डासना मंदिरात पाणी पिण्यासाठी एक मुस्लीम मुलगा आला होता तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली होती तेव्हा या मंदिराचे महंत असलेले नरसिंहानंद सरस्वती चर्चेत आले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या समर्थकांनी त्या मुलाला मारलं कारण ते सर्व मुस्लिमांना संशयाच्या नजरेने पाहतात. आमच्या मंदिर परिसरात कोणत्याही मुस्लिमांना प्रवेश दिला जात नाही. मग तो पत्रकार असो वा सरकारी अधिकारी. हे मंदिर सनातन धर्माच्या भक्तांसाठी आहे असं ते म्हणाले होते.