दिल्ली-एनसीआरमध्ये पाळीव कुत्रे हल्ले करत असल्याच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना पुन्हा एकदा घडली आहे. गुरुवारी गाझियाबादच्या संजयनगर येथील उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या दहा वर्षांच्या मुलावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाले. कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याला चावा घेतला. यापूर्वी, गाझियाबादमधील एका सोसायटीच्या लिफ्टचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एका मुलाला पाळीव कुत्रा चावला होता, एक महिलादेखील घटनास्थळी उपस्थित होती. हा हल्ला थांबवण्यासाठी तिने काहीही केलं नाही किंवा नंतर मुलाला मदत केली असा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी घडलेल्या घटनेत एका पिटबुल कुत्र्याने मुलाच्या चेहऱ्याला चावा घेतला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्या चेहऱ्यावर तब्बल 100 टाके पडले आहेत. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, एक तरुणी कुत्र्यासोबत फिरत होती. त्याचवेळी कुत्र्याने मुलावर हल्ला केला. याआधी नोएडाच्या एका सोसायटीतही एका कुत्र्याने लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. या व्हिडिओमध्ये अपोलो फार्मसीचा एक डिलिव्हरी बॉय औषध देण्यासाठी लिफ्टमध्ये जात असल्याचे दिसत होते.
एक माणूस आपल्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमध्ये उभा आहे. लिफ्ट उघडताच अचानक कुत्र्याने डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. हरियाणातील गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. सुदैवाने महिलेचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी तिला पिटबुलच्या जबड्यातून वाचवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरुग्रामच्या सिव्हिल लाईन भागात ही भयंकर घटना घडली होती. मुन्नी नावाची महिला ड्युटीवर जात होती. यावेळी वाटेत एक पिटबुल कुत्रा फिरत होता. त्याने अचानक महिलेवर मागून हल्ला केला. कुत्र्याने महिलेचे डोके त्याच्या जबड्यात पकडले, यामुळे तिला रक्तस्त्राव झाला. मात्र महिलेचा आरडाओरडा ऐकून लोकांनी तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. महिलेच्या डोक्याला गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. पिटबुलने महिलेच्या डोक्यात दात घुसवल्याचे दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.