गाझीपूर-
गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेल्या दिवंगत कमलेश सिंह याच्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर स्थित फुल्लनपूर रेल्वे क्रॉसिंगजवळील साम्राज्यावर 'बाबा का बुलडोझर' चालवण्यात आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात पाडकामाचे आदेश देण्यात आले होते. याच ठिकाणी वाणिज्यकर कार्यालय देखील होतं.
शनिवारी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानंतर तत्काळ हे कार्यालय रिकामी करण्यात आलं. त्यानंतर आज एसडीएम सदर, क्षेत्राधिकारी, तहसीलदार आणि जिल्हा प्रशासन तसंच पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाजीपूर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर आज सकाळी या ठिकाणी पोहोचले. माफीया डॉन मुख्तार अन्सारी गँगचा सदस्य राहिलेल्या दिवंगत कमलेश सिंह प्रधान याच्या फुल्लनपूर क्रॉसिंग स्थित कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवण्यात आला. यात दुकान आणि राहतं घर उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे घर अवैधरित्या बांधण्यात आलं होतं. ज्यास कोणत्याही प्रकारचा परवाना मिळाला नव्हता. मे २०२२ मध्ये यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गेल्या दोन दशकांपासून याच इमारतीत व्यापार कर आणि नंतर वाणिज्य कर कार्यालय देखील सुरू करण्यात आलं होतं. त्यामुळेच या बांधकामावर कारवाई होण्यास उशीर लागला. शनिवारी वाणिज्य कर कार्यालय जिल्हाधिकारी गाजीपूरच्या नोटीसनंतर रिकामी करण्यात आलं. तसंच इतर भाडेकरुंनाही इमारत रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आज सकाळी सुरक्षा बंदोबस्तात कारवाई केली गेली.