नवी दिल्ली - येथे प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुरुवारी सरकारकडून शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात, गाझीपूर बॉर्डरवरील आंदोलन स्थळावरील टेंट काढून, तेथील वीज आणि पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला होता. मात्र, तरीही त्याचा शेतकऱ्यांवर काहीही परिणाम होताना दिसत नाही. उलट, यावर तोडगा काढत या शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी विजेच्या व्यवस्थेसाठी सोलार पॅनल आणि सोलार इंव्हर्टर लावायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर मोबाईल चार्ज करण्यासाठी या शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्सदेखील तयार केले आहेत.
भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या आवाहनानंतर येथे पुन्हा शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. 26 जानेवारीनंतर आता आंदोलन जवळपास संपले आहे, असे वाटू लागले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी राकेश टिकैत यांचे व्हिडिओ टीव्हीवर दाखविण्यात आल्याने परिस्थिती पुन्हा वेगाने बदलली आणि शेतकरी पुन्हा आंदोलन स्थळी परतायला सुरुवात झाली.
Farmer protest: आंदोलन स्थळ रिकामे करणार होते टिकैत, पण भाजपा आमदाराने सारा खेळ बिघडवला?
गाझीपूर बॉर्डरवर भारतीय किसान यूनियन (बीकेयू)च्या समर्थक शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मेरठ, बागपत, बिजनौर, मुझफ्फरनगर, मुराबादाबाद तसेच बुलंदशहरासारख्या पश्चिम उत्तर प्रदेशामधील जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी यूपी गेटवर पोहोचले आहेत. केंद्र सरारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गेल्या 28 नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.
गाझीपूर बॉर्डरवर अद्यापही मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत. तसेच आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.
Farmer Protest: शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर; पंतप्रधान मोदींची भावनिक साद
मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना घातली भावनिक साद - कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना भावनिक साद घातली. शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकते. संवादाचे द्वार नेहमीच खुले आहे, असे पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत म्हणाले. 'कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या विधानाचा मी पुनरुच्चार करू इच्छितो. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नसला तरीही आम्ही शेतकऱ्यांसमोर पर्याय खुले ठेवले आहेत. त्यांनी यावर चर्चा करावी. शेतकरी आणि माझ्यात केवळ एका कॉलचे अंतर आहे,' असे मोदींनी म्हटले आहे.