हैदराबाद - बहुचर्चित ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेचे (GHMC) निवडणूक निकाल आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत 48 जागांवर विजय मिळवला आहे. येथे भाजप दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्ष चारीमुंड्या चित झाले. काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाने या निवडणुकीत 100 हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, केवळ दोनच उमेदवार निवडून आले. हे दोनही उमेदवार काँग्रेसचे आहेत.
भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले. काँग्रेसने या महापालिकेच्या 150 जागांपैकी तब्बल 146 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र यांपैकी केवळ दोनच निवडून आले. काँग्रेसपेक्षाही तेलुगू देशम पक्षाची स्थिती वाईट राहीली. कारण त्यांनी तब्बल 106 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र त्यांचा एकही उमेदवार नवडणून येऊ शकला नाही.
या निवडणुकीत भाजपने 149 उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि त्यासाठी पक्षाने केंद्रातील नेते येथे प्रचारासाठी पाठवले. याचा परिणामही या निवडणुकीत दिसून आला. यामुळे भाजपच्या खात्यात 48 जागा आल्या. तर या निवडणुकीत एआयएमआयएम तिसऱ्या स्थानी राहिला.
येथे 2016 च्या निवडणुकीत केवळ 3 जागा जिंकणाऱ्या भाजपने 12 पट अधिक चांगली कामगीरी करत 48 जागा जिंकल्या. 2016 च्या निवडमुकीत भाजपने टीडीपीसोबत युती केली होती. तर 2009 च्या निवडणुकीत भाजपला 6 जागांवर विजय मिळाला होता.
असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIMने 51 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांपैकी त्यांचे 44 उमेदवार निवडून आले. तेलंगणातील सत्ताधारी पक्ष असलेल्या टीआरएसला 56 जागांवर विजय मिळाला. केसीआर यांच्या पक्षाने सर्वच्या सर्व 150 जागांवर उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी, 2016 मध्ये झालेल्या ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएसने 150 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर AIMIMने 44 जागाच जिंकल्या होत्यात. काँग्रेसंला तेव्हाही दोनच जागा मिळाल्या होत्या.