हैदराबाद - ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हैदराबाद दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही येथील मल्काजगिरी येथे रोडशो करत जनतेला संबोधित केले. यावेळी योगी म्हणाले, ''आपल्या सर्वांना निश्चित करायचे आहे, की एका कुटुंबाला आणि मित्र मंडळाला लुटायचे स्वातंत्र्य द्यायचे, की हैदराबादला पुन्हा भाग्यनगर करून विकासाच्या शिखरावर न्यायचे. बंधुंनो हे आपल्याला निश्चित करायचे आहे.''
योगी आदित्यनाथ म्हणाले, "मला काही लोकांनी विचारले, की हैदराबादचे नाव भाग्यनगर होऊ शकते का? मी म्हणालो, का नाही? आम्ही फैजाबादचे नाव अयोध्या केले, अलाहाबादचे नाव प्रयागराज केले. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले. मग हैदराबादचे नाव भाग्यनगर का होऊ शकत नाही?”
योगी म्हणाले, ''मला माहीत आहे, की येथील सरकार एकीकडे जनतेची लूट करत आहे, तर दुसरीकडे AIMIMच्या नादाला लागून भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे.'' त्यामुळे या लोकांविरुद्ध नवी लढाई लढण्यासाठी, आपल्या सोबत खांद्याला खांदा लाऊन चालण्यासाठी मी भगवान श्री रामांच्या भूमीतून स्वतः आलो आहे."
योगी आदित्यनाथ ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या 150 वॉर्डांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत. त्यांच्या या रोड शोमध्ये मोठी गर्दी दिसून आली. योगिंच्या या निवडणूक प्रचाराकडे एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांना थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील येथे प्रचारासाठी येणार आहेत.
ओवेसी यांनी या निवडणुकीसाठी येथे 51 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. हैदराबाद महापालिका निवडणुकीतही असदुद्दीन ओवेसी यांनी जुन्या हैदराबाद भागात आपल्या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यांपैकी पाच जागांवर हिंदू उमेदवार आहेत. ओवेसी यांचे साधारणपणे 10 टक्के उमेदवार हिंदू आहेत. ओवेसी यांनी हिंदू उमेदवारांना अशा भागात उभे केले आहे, जेथे हिंदू-मुस्लीम लोकसंख्या जवळपास सारखीच असेल आणि तेथे विधानसभा जागेवरही एआयएमआयएमच्या आमदारांचा कब्जा आहे.