डॉ. खुशालचंद बाहेती -
अलाहाबाद : अलाहाबाद हायकोर्टासमोर भूत तक्रारदार असलेल्या असामान्य प्रकरणाची सुनावणी झाली. एका व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी फसवणूक आणि बनावट दस्तावेजाचा एफआयआर दाखल केल्याचे हे प्रकरण आहे.
पुरुषोत्तम सिंग यांनी त्यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तावेज तयार केल्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्यावर शब्द प्रकाश यांनी जमिनीच्या वादातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा त्यांचा दावा होता. शब्द प्रकाश यांच्या वतीने अधिवक्ता विमल कुमार पांडे यांनी १९ डिसेंबर २०२३ रोजी ममता देवी यांच्या स्वाक्षरीने हायकोर्टात वकालतनामा दाखल केला आहे.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की, शब्द प्रकाश यांचा मृत्यू १९ डिसेंबर २०११ रोजी झाला होता. २०१४ मध्ये त्यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला. मुख्य न्यायदंडाधिकारी, कुशीनगर यांनी शब्द प्रकाशच्या मृत्यूची पुष्टी केली.
हे ऐकून आम्ही नि:शब्द असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी यांनी नोंदवले. एका मृत व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी एफआयआर दाखल करणे हे फारच विचित्र आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला. तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले व मृत व्यक्तीला फिर्यादी पक्षाचा साक्षीदार म्हणून पुढे केले. आता सुनावणीत त्यांच्या वतीने वकीलही उभे आहेत.
सर्व कार्यवाही भुताटकीने चालवलीसर्व कार्यवाही भुताटकीने चालवल्याचे दिसून येते, असे म्हणत हायकोर्टाने फौजदारी खटल्याची कार्यवाही रद्द केली आणि कुशीनगरच्या पोलीस अधीक्षकांना तपास अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांना मृताच्या वतीने वकालतनामा दाखल करणाऱ्या वकिलाला भविष्यात दक्ष राहण्याचा सल्ला देण्यास सांगितले.