वाराणशी : इतिहासानं भूगोलाच्या माथी ओढलेली जळती रेषा ओलांडण्याचं सप्तसुरांचं सामर्थ्य किती विलक्षण असतं याची प्रचिती घेण्याचा योग गंगाकिनारी जुळून आला आहे. उस्ताद गुलाम अली यांच्या गजलेतील दर्द, खर्ज आणि तालाशी लीलया खेळणारी अदा अनुभवण्याची पर्वणी वाराणशीवासीयांना साधता येणार आहे. निमित्त आहे ते येथील संकटमोचन मंदिरात बुधवारपासून सुरू होणाऱ्या संगीत महोत्सवाचे. संगीत साधनेतून ईश्वरचरणी सेवा रुजू करण्याच्या या परंपरेचा पाईक होणारे गुलाम अली हे पहिले पाकिस्तानी कलावंत असतील. त्यांचा हा सजदा बनारसी पानापेक्षाही अधिक रंगण्याची रसिक श्रोत्यांना अपेक्षा आहे. कारगिलच्या संघर्षानंतर दिल्ली - लाहोरदरम्यानच्या भावबंधनाचा सेतू बनलेली सदा-ए-सरहद ही बससेवा बंद झाली. पाकिस्तानी गायक - कलावंतांच्या भारतातल्या मैफिलींवर गदा आली. संस्कृतीच्या सूरमयी व्यासपीठावर विद्वेषाचा पडदा पडला. हा पडदा आता उठतो आहे. गंगेच्या साक्षीनं सांस्कृतिक जळमट धुतलं जातंय. गुलाम अलींच्याच सुरातून मुखर झालेल्या गजलेच्या भाषेत सांगायचं तर...दिल में एक लहर सी उठी हैं अभीकोई ताजा हवा चली हैं अभी...
गुलाम अली गंगाकिनारी
By admin | Published: April 09, 2015 4:35 AM