काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या पक्षाचे १३ उमेदवार जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत उतरविले आहेत. तसेच आपनेही सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. माजी मुख्यमंत्रीी उमर अब्दुल्ला ज्या जागेवरून उमेदवार आहेत तिथे देखील या पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
जम्मू-काश्मीरविधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी हे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अब्दुल्लांच्या विरोधात गांदरबल मतदारसंघातून आझाद यांनी कैसर सुल्तान गनी यांना उमेदवारी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात २४ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी २७ ऑगस्ट ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक घेतली जाणार आहे. यानुसार १८ सप्टेंबरला पहिला टप्पा, २५ सप्टेंबरला दुसरा आणि १ ऑक्टोबरला तिसरा टप्प्यात मतदान होणार आहे. ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.
आपने सात उमेदवारी जाहीर करताना स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. या यादीमध्ये दिल्ली तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचे देखील नाव आहे. याशिवाय सुनिता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष सिसोदिया आदी नेत्यांची नावे आहेत. जम्मू काश्मीरसोबत हरियाणामध्येही विधानसभा निवडणूक होत आहे. याची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.