Ghulam Nabi Azad, Kashmir Politics: काश्मीरच्या राजकारणात नवी 'एन्ट्री'! गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केलं पक्षाचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:06 PM2022-09-26T13:06:33+5:302022-09-26T13:07:46+5:30
आझाद यांनी २६ ऑगस्टला काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी
Ghulam Nabi Azad, Kashmir Politics: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची आज घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव 'डेमोक्रेटिक आझाद पार्टी' आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेससोबतचे त्यांचे पाच दशकांहून अधिक जुने नाते तोडले होते. ते रविवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मूत आले आहेत. त्या दरम्यान आज त्यांनी नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. पक्षाची विचारधारा आपल्या नावासारखीच 'आझाद' असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील, असे ते म्हणाले. त्यांनी पक्षाचा अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे याचा समावेश आहे.
Jammu | Ghulam Nabi Azad announces the name of his new party - 'Democratic Azad Party'
— ANI (@ANI) September 26, 2022
He resigned from the Congress party on August 26th. pic.twitter.com/xKKrVYMvOd
मार्च २०२२ मध्ये, गुलाम नबी आझाद यांना माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला. १९७३ मध्ये गुलाम नबी आझाद यांनी डोडा जिल्ह्यातील भालेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणाला सुरुवात केली. यानंतर त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेसने त्यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. १९८० मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. १९८२ मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. आझाद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या UPA सरकारमध्ये देशाचे आरोग्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. या दरम्यान त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा विस्तार केला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या शहरी गरिबांना सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान देखील सुरू केले. आझाद यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते संसदीय कामकाज आणि नागरी विमान वाहतूक मंत्रीही होते.
गुलाम नबी आझाद यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुवर्णकाळ २००५ मध्ये आला. ते जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री बनले. आझाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. २००८ मध्ये अमरनाथ जमीन आंदोलनामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा स्वत:च्या पक्षाच्या मार्फत ते राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहेत.