"कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाही", जाहीर सभेत गुलाम नबी आझाद यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 03:37 PM2022-09-11T15:37:44+5:302022-09-11T15:38:14+5:30
ghulam nabi azad : येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी याच सभेत सांगितले.
जम्मू-काश्मीर : कलम 370 संदर्भात गुलाम नबी आझाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कलम 370 हे मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी परत आणू शकत नाही, असे जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना गुलाम नबी आझाद म्हणाले. तसेच, येत्या 10 दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही गुलाम नबी आझाद यांनी याच सभेत सांगितले.
दरम्यान, काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर लगेचच मी जम्मू-काश्मीरमध्ये येत आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले होते. तसेच, केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीत नव्या पक्षासोबत जाण्याबाबत ते बोलले होते. 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस सोडण्यापूर्वी गुलाम नबी आझाद नेत्याने जवळपास 5 दशके काँग्रेसमध्ये होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्य राहिले. तसेच, त्यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेत्यांचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात असल्याचे संकेत देत यांनी गुलाम नबी आझाद यांनी आपल्यावर कोणाचेही नियंत्रण नाही, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. ते म्हणाले, "मी त्यांच्यासारखा नाही, ज्यांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्यांकडे आहे. माझ्याकडे माझा रिमोट कंट्रोल आहे. मी स्वातंत्र्य आहे, ते गुलाम आहेत. मी नबी (प्रेषित) चा गुलाम आहे. ते कोणाचे तरी गुलाम आहेत. काँग्रेस किंवा इतर पक्षांचे नेते कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत, हे मला उघड करायचे नाही."
गेल्या गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील भदरवाह येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेत्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना मी फक्त रायफलने प्रत्युत्तर दिले आहे" असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "त्यांनी माझ्यावर क्षेपणास्त्रे डागली, मी फक्त 303 रायफल्सने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस गायबच झाली असती" असे म्हणत हल्लाबोल केला. त्यावेळी "मी 52 वर्षांपासून पक्षाचा (काँग्रेस) सदस्य होतो आणि राजीव गांधींना माझा भाऊ आणि इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शब्द वापरण्याची माझी इच्छा नाही" असे म्हटले होते.
"मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही"
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर जम्मूमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेला गुरुवारी संबोधित केले. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी घोषणा केली की ते स्वतःची राजकीय संघटना सुरू करतील, जी पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेल. मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही. यासाठी मी जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून सूचना घेईन. हे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. प्रत्येकाला समजेल असे हिंदुस्थानी नाव मी माझ्या पक्षाला देईन असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.