Ghulam Nabi Azad : "काँग्रेसने माझ्यावर क्षेपणास्त्र डागली, मी फक्त 303 रायफलने प्रत्युत्तर दिले"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 09:47 IST2022-09-10T09:38:53+5:302022-09-10T09:47:26+5:30
Ghulam Nabi Azad And Congress : गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आत गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसबाबत मोठं विधान केलं आहे.

Ghulam Nabi Azad : "काँग्रेसने माझ्यावर क्षेपणास्त्र डागली, मी फक्त 303 रायफलने प्रत्युत्तर दिले"
काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आत गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसबाबत मोठं विधान केलं आहे. "काँग्रेस नेत्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना मी फक्त रायफलने प्रत्युत्तर दिले आहे" असं म्हटलं आहे. आझाद यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील भदरवाह येथे एका सभेला संबोधित करताना हे विधान केलं आहे.
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "त्यांनी माझ्यावर क्षेपणास्त्रे डागली, मी फक्त 303 रायफल्सने प्रत्युत्तर दिले आणि त्यांना नष्ट केले. मी जर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वापरले असते तर मग काँग्रेस गायबच झाली असती" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. त्यावेळी "मी 52 वर्षांपासून पक्षाचा (काँग्रेस) सदस्य होतो आणि राजीव गांधींना माझा भाऊ आणि इंदिरा गांधींना माझी आई मानतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शब्द वापरण्याची माझी इच्छा नाही" असं म्हटलं आहे.
"मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही"
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर जम्मूमध्ये त्यांच्या पहिल्या जाहीर सभेला गुरुवारी संबोधित केले. यावेळी आझाद यांनी घोषणा केली की ते स्वतःची राजकीय संघटना सुरू करतील, जी पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेल. मी अद्याप माझ्या पक्षाचे नाव निश्चित केलेले नाही. यासाठी मी जम्मू-काश्मीरमधील लोकांकडून सूचना घेईन. हे लोक पक्षाचे नाव आणि झेंडा ठरवतील. प्रत्येकाला समजेल असे हिंदुस्थानी नाव मी माझ्या पक्षाला देईन असंही सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मी काँग्रेस सोडून गेलो नाही, मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं"
आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर याआधी निशाणा साधला होता. राहुल गांधी यांच्यात राजकीय कौशल्य नाही आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतरच काँग्रेसची ही स्थिती झाली आहे. आजच्या काळात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा कोणताही अर्थ नसल्याचंही आझाद म्हणाले होते. मी काँग्रेस सोडून गेलो नाही, तर मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडलं असंही ते म्हणाले. कोण स्वतः आपलं घर सोडतो. माझ्या कुटुंबीयांनी मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले. जेव्हा घरच्यांना वाटतं की हा माणूस नको आहे. घरातच जर आपल्याला परकं समजलं जाऊ लागलं तर? पुढे-मागे करणाऱ्या किंवा ट्वीट करणाऱ्या लोकांनाच पक्षात पद मिळतं असं काँग्रेस सोडण्याच्या प्रश्नावर आझाद म्हणाले. होते.