Congress: गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला जबरदस्त धक्का, ५१ नेते देणार राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:44 PM2022-08-30T13:44:04+5:302022-08-30T13:44:36+5:30
Ghulam Nabi Azad: काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
श्रीनगर - काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहरलाल शर्मा यांच्यासह काँग्रेसचे ५१ मोठे नेते लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार आहेत, हे नेते रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दाखल होणार आहेत.
काँग्रेसचे जे नेते राजीनामा देणार आहेत. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, जम्मू काश्मीर काँग्रेसचे सरचिटणीस बलवान सिंह, माजी मंत्री घारू चौधरी, माजी मंत्री मनोहरलाल शर्मा, गुलाम हैदर मलिक, विनोद शर्मा, विनोद मिश्रा, नरिंदर शर्मा, मसूद, परविंदर सिंह, आराधना अंदोत्रा, संतोष मनहास, संतोष मनजोत्रा, वरुण मंगोत्रा, रेहाना अंजुम, रजपौल भारद्वाज, तीरथ सिंह, नीरज चौधरी, सरनाम सिंह, राजदेव सिंह, अशोक भगत, अश्विनी शर्मा, बद्री शर्मा, जगतार सिंह, दलजित सिंह, मदनलाल शर्मा, काली दास, करनेल सिंह, करण सिंह, गोविंद राम शर्मा, रामलाल भगत, केवल कृष्ण, देवेंद्र सिंह बिंदू, कुलभूषण कुमार यांच्यासह एकूण ५१ जण राजीनामा देणार आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र लिहून काँग्रेसमधील दोषांवर बोट ठेवले होते. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप केले होते.