काँग्रेस पक्षश्रेष्ठी अन् असंतुष्ट गटात समेट?; खरगे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:20 AM2022-03-20T08:20:15+5:302022-03-20T08:21:33+5:30
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटामध्ये समेट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असंतुष्ट गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर आज (शनिवार) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल सकारात्मक वक्तव्य दिले. आझाद यांनी काँग्रेससाठी ५० वर्षे दिली आहेत. काँग्रेस मजबूत व्हावी, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना सर्वांचाच पाठिंबा आहे, असेही खरगे यावेळी म्हणाले. पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी केवळ गांधी कुटुंबीयांवर खापर फाेडणे चुकीचे असल्याचेही खरगे म्हणाले. खरगे यांच्या भेटीनंतर काँग्रेसमधील संवाद अधिक सकारात्मक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये कलह सुरू आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याच्या मागणीला जोर आला आहे. यासंदर्भात असंतुष्ट गटाने सोनिया गांधी यांना पत्र दिले आहे.