गुलाम नबी कॉंग्रेसमधून 'आझाद', पाच दशकांनंतर पाच पानी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 05:28 AM2022-08-27T05:28:59+5:302022-08-27T05:29:28+5:30

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास पाच दशकांच्या सोबतीनंतर शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

Ghulam Nabi Azad resigns from all positions of Congress | गुलाम नबी कॉंग्रेसमधून 'आझाद', पाच दशकांनंतर पाच पानी राजीनामा

गुलाम नबी कॉंग्रेसमधून 'आझाद', पाच दशकांनंतर पाच पानी राजीनामा

Next

नवी दिल्ली :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास पाच दशकांच्या सोबतीनंतर शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अलीकडच्या काळात कपिल सिब्बल व आणि अश्विनीकुमार यांसारख्या दिग्गज होता. आझाद यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राजीनामा देताना आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाच पानी पत्र लिहिले. देशातील सर्वात जुना पक्ष आता पूर्णपणे नष्ट झाला असून, सध्या बनावट संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली धोका दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय जड अंत:करणाने घेत आहोत. दरबारी मंडळी पक्ष चालवत असून, त्यामुळे पक्ष देशासाठी लढण्याची इच्छाशक्ती व क्षमता गमावून बसला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आझाद यांनी अलीकडेच जम्मू-काश्मीर प्रदेश प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आझाद यांची कृती दुर्दैवी असून, पक्ष महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून भाजपशी लढत असताना राजीनामा दिला. राजीनाम्यासाठी निवडलेली वेळ भयंकर आहे, असे काँग्रेसने म्हटले,

राजीनामापत्रात काय म्हटले आहे?

संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया एक फार्स
पक्षातील संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला फार्स संबोधून ते म्हणाले की, पक्षात कोणत्याही स्तरावर निवडणूक झालेली नाही. २४ अकबर रोडवर बसलेल्या अ. भा. काँग्रेस समितीच्या, (एआयसीसी) निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना एआयसीसी चालवणाऱ्या छोट्या गटांनी तयार केलेल्या याद्यांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले.

सोनिया गांधी केवळ नावापुरत्या नेत्या
राहुल गांधी यांनी सर्व वरिष्ठ अपमानित केल्यानंतर घाईगडबडीने राजीनामा दिला आणि त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून तुम्ही पदभार सांभाळला. हे पद आपण तीन वर्षापासून सांभाळत आहात. सोनिया गांधी आता केवळ नावापुरत्या नेत्या आहेत.

सल्लामसलत प्रणाली उद्ध्वस्त, खुशामतखोरांकडे सत्रे
काँग्रेसच्या व दुर्दैवाने राहुल गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर विशेषकरून जानेवारी २०१३ नंतर (जेव्हा तुम्ही त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवले) तत्पूर्वी अस्तित्वात असलेली पक्षाची सल्लामसलत प्रणाली त्यांनी उदध्वस्त केली. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारून नव्या अननुभवी, खुशामतखोरांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्यात आली. राहुल गांधी यांचे सुरक्षारक्षक, खासगी सचिव निर्णय घेतात या रिमोट कंट्रोल मॉडेलने आधी संपुआ सरकारची संस्थात्मक एकात्मता नष्ट केली आणि आता पक्षाची.

४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ ठिकाणी काँग्रेसचा पराभव
२०१४ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पराभव झाला. नंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. २०१४ ते २०२२ दरम्यान ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ निवडणुकांत काँग्रेसच्या वाट्याला पराभव आला.

अपरिपक्व कृतीमुळेच पक्षाचा पराभव
संपुआ सरकारच्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेशाच्या प्रती फाडल्याच्या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले की, अपरिपक्वतेचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. या बालिश कृतीने पंतप्रधान आणि भारत सरकारच्या प्रतिमेवर मोठा आघात झाला. या कृतीनेच २०१४ च्या निवडणुकीत संपुआला पराभवाचे तोंड पहावे लागले.

काँग्रेस पूर्णपणे नष्ट,आता स्थिती बदलणे अशक्य
दुर्दैवाने कॉंग्रेसची स्थिती या स्तरावर गेली आहे की, परतीचा मार्ग दिसत नाही. पक्षाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी ते आता प्रतिनिधी तयार करू लागले आहेत. मात्र, हा प्रयोगही फसणार आहे. कारण, काँग्रेस पूर्णपणे नष्ट झालेली असून, ही स्थिती बदलता येऊ शकत नाही.

भारत जोडो नव्हे, काँग्रेस जोडो यात्रेची गरज
बूथ, ब्लॉक, जिल्हा किंवा राज्य स्तरावर कुठेही मतदार यादी प्रकाशित केलेली नाही. पक्षाशी झालेल्या या विश्वासघातासाठी नेतृत्व जबाबदार आहे. भारत जोडो यात्रा काढण्यापूर्वी काँग्रेस जोडो यात्रा काढायला हवी.,

हा काही परिपक्व निर्णय नाही. आझाद हे दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये होते. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि राहतील. पक्षासाठी काही करणे हे आमचे कर्तव्य आहे. कहानी यह नहीं की वे गए, कहानी ये है की हम नहीं जा रहे हैं.
-सलमान खुर्शीद, काँग्रेस नेते 

आझाद यांनी नेतृत्वावर केलेले आरोप अयोग्य आहेत. ज्यांची ओळखच देशात काँग्रेसमुळे आहे, त्यांच्याकडून अशी विधाने अपेक्षित नाहीत. ज्या व्यक्तीला पक्षाने ४२ वर्षे पदाशिवाय ठेवले नाही ती व्यक्ती काँग्रेसबाबत अशी वक्तव्ये करते, याची अपेक्षा नव्हती.
-अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

 

Web Title: Ghulam Nabi Azad resigns from all positions of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.