पूर्वीच्या आणि आताच्या काँग्रेसमध्ये जमीन-आस्मानाचा फरक - गुलाम नबी आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 07:44 AM2021-07-05T07:44:36+5:302021-07-05T07:46:25+5:30
तेव्हाच्या आणि आताच्या काँग्रेस पक्षात काय फरक आहे? तुम्ही ५० वर्षांपासून काँग्रेस बघत आहात; आझाद म्हणाले...
गुलाम नबी आझाद हे इंदिरा गांधी यांच्या काळातील नेते आहेत आणि आज ते त्याच काँग्रेसच्या कामकाजामुळे दु:खी आहेत. आझाद यांचा समावेश आज असंतुष्ट नेत्यांत होत असून जी-२३ ग्रुपचे ते नेते आहेत. ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांनी घेतलेली त्यांची विशेष मुलाखत. (Ghulam Nabi Azad says The difference between the past and the present Congress)
तेव्हाच्या आणि आताच्या काँग्रेस पक्षात काय फरक आहे? तुम्ही ५० वर्षांपासून काँग्रेस बघत आहात.
- तेव्हा पक्षाची शक्ती खूप होती. आम्ही युवक काँग्रेसमध्ये असायचो. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा सन्मान असायचा. इंदिराजींनी मृत्यूच्या आधीच मला युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवले होते. १९८२ मधील घटना आहे. मॅडमकडून मी आणि माझी पत्नी सुट्या घालवण्यासाठी मॉस्को आणि तेथून युरोप दौऱ्यासाठी परवानगी घेेऊन १५ दिवसांसाठी गेलो. माॅस्कोला आलो. तिसऱ्या दिवशी नूरुल हसन साहेबांचा फोन आला. ते मॉस्कोत राजदूत होते. ते म्हणाले, “दिल्लीहून बोलावणे आले आहे. आजच परत जा. तुम्हाला शपथ घ्यायची आहे.” मी म्हणालो, “माझी युवक काँग्रेस अध्यक्षपदाची अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. मंत्री व्हायला अजून सगळे आयुष्य बाकी आहे. अध्यक्ष तर दुसऱ्यांदा बनणार नाही.”
म्हणजे तुम्हाला मंत्रिपद नको होते? -
- तसे अजिबात नव्हते. तेव्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला मोठी प्रतिष्ठा होती. विशेषत: युवक काँग्रेसला.
मग काय झाले?
- मी मॉस्कोहून तार पाठवली. लंडन, युरोप फिरल्यानंतर दिल्लीत इंदिराजींकडे गेलो. त्या म्हणाल्या, “सकाळी शपथ घ्यायची आहे.” मी म्हणालो की, “पुनर्रचना तर झाली आहे.” त्यावर त्या म्हणाल्या, “ते झाले खरे, पण तुमचे तर झालेले नाही.” मी म्हणालो, “मॅडम माझ्याकडे खूप वेळ आहे. डोगरा साहेब ७५ वर्षांचे आहेत. त्यांना बनवा.” त्यावर त्या म्हणाल्या, “ते ३० वर्षे मंत्री होते. काश्मीरमधून मला तुम्हालाच बनवायचे आहे.” मी मग शपथ घेतली.
आता काँग्रेसमध्ये काय झाले आहे?
- तेव्हा प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता होता. आज कार्यकर्ता नाही. १९७७ मध्ये नेते पळून गेले होते. परंतु, कार्यकर्ते आमच्याकडे होते. आज नेते आहेत. कार्यकर्ते नाहीत. आज नेते आहेत. परंतु, त्यांच्यासोबत कोणी नाही. तेव्हा नेते गेले होते. परंतु, कार्यकर्ते गेले नव्हते.
काँग्रेसची आज जी अवस्था आहे त्यावर उपाय काय?
- हा उपाय छोट्या कालावधीचा नाही. मध्यम व दीर्घ मुदतीचा आहे. म्हणजे छोट्या, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा. उदा. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओदिशा लाँग टर्म प्लॅनमध्ये येतील. येथे पाच वर्षांत सरकार स्थापन करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यासाठी अनेक थांबे असतील. त्याची कृती याेजना वेगळी आहे. टप्प्याटप्प्याने जशी इमारत बांधली जाते. थेट ४० वा मजला बांधला जात नाही. जमिनीत पायाभरणी होते. मग मध्यम मुदत. त्यात बिहार आणि अनेक राज्ये आहेत. मग लघु मुदत जेथे निवडणूक जिंकली होती. पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश आहे.
परंतु, पक्षात असा काही विचार आहे का?
- काहीही विचार नाही. कोणाला असे केले जाऊ शकते हेदेखील माहीत नाही. तिन्ही लागू करण्यासाठी तीन वेगळे सेट ऑफ लीडर्स असले पाहिजेत. सल्ला दुसऱ्याचा असू शकेल. परंतु, दीर्घ मुदतीसाठी तुमचे वय असले पाहिजे. ४५ आणि ५० वयाचे नेते असले पाहिजेत. काम करणाऱ्याला सांगता येते की, हे तुमचे १५ वर्षांचे काम आहे. जर तो ४५ वर्षांचा असेल तर तो ६० वर्षांपर्यंत लक्ष्य गाठेल. हे राबवण्याची बाब आहे. परंतु, जो दिल्लीत चालक आहे त्याला हे जोपर्यंत कन्याकुमारी येत नाही तोपर्यंत सोडणार नाही.
म्हणजे फक्त चिठ्ठ्या लिहून, ट्विटरने काम होणार नाही.
- ना आमच्या पत्रकार परिषदेने काही होणार ना आम्ही चिठ्ठी लिहून ना ती वाचून. दोन प्रकारचे राजकारण होत असते. एक संघटन, दुसरे सरकार. सरकार कागद- पेेन्सिलने चालू शकते. कार्यालय चालू शकेल. संघटन फक्त जमिनीवर चालेल. थेट एकमेकांशी संपर्क. आजचे तंत्रज्ञान त्याला पूरक आहे पण त्याची जागा घेऊ शकत नाही. ट्विटर, फेसबुक, टेलिफोन, एसएमएसचा वापर करून तुम्ही ते पूरक काम करू शकता पण, शेत कसावे लागेल. त्यासाठी तुम्हालाच सामान्यांपर्यंत जावे लागेल. गावात जावे लागेल. शेत असेल तर शेतात जावे लागेल.
म्हणजे राजकीय संस्कृती बदलून गेली आहे?
- आज संस्कृतीही बदलली आहे. त्यात बांधिलकीही नाही. तेव्हा पंतप्रधानांना मी मंत्री होऊ इच्छित नाही, अशी चिठ्ठी लिहीत होतो. आज जर कोणी प्रेसिडेंट बनला तर तो मी मंत्री कसा बनेन याचाच सतत विचार करतो.
...तर पक्षाला आज १९७९ च्या गुलाम नबी आझाद यांची तुकडी हवी आहे
- लोक तुमच्याकडे होते. फक्त गरज होती पोहोचण्याची. तेव्हा सत्ताधारी पक्ष (भाजप) एवढा आक्रमक नव्हता. एवढा संसाधनांनी युक्त नव्हता. त्याच्याकडे नेते होते, कार्यकर्ते नव्हते.
- आज तो आर्थिकदृष्ट्या खूप बळकट आहे. पैसा तर आमच्याकडे तेव्हाही नव्हता. पण आमच्याकडे मनुष्यबळ जास्त होते. आज त्यांच्याकडे मनुष्यबळ, पैसा आणि आक्रमकपणा तिन्ही आहे.
- तेव्हाची गोष्ट वेगळी होती. दोघांची आव्हाने वेगळी होती. त्याची तुलना आजशी करता येणार नाही.
- आज ५० माणसे शोधून आणावी लागतील. तेव्हा एक हजार माणसे युवक काँग्रेसच्या एका नेत्याच्या इशाऱ्यावर येत होते. आज संघर्ष दीर्घ आहे. कोणताच शॉर्टकट नाही.