नवी दिल्ली : हे सर्व आश्चर्यकारक आणि अचंबित करणारे आहे. अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे काम केवळ भाजप सरकारच करेल, हे मला माहिती होते. परंतु, ते इतक्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली (ghulam nabi azad says i never expected from modi government to abrogate article 370)
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असलेल्या गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. यावेळी अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रु अनावर झाले होते. या सर्व प्रसंगानंतर गुलाम नबी आझाद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनले आहेत.
"ही तुमची लोकशाही"; घरासमोरचा फोटो शेअर करत अब्दुल्लांचा मोदी सरकारवर हल्ला
अशी कल्पना आयुष्यात कधीच केली नव्हती
जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येईल, अशी कल्पना मी उभ्या आयुष्यात केली नव्हती. मोदी सरकारने विशेष राज्याला कमीपणा आणण्यासाठी असे केले असून, जोपर्यंत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत राजकीय स्थैर्य येणार नाही, असा दावा आझाद यांनी यावेळी बोलताना केला.
काँग्रेस आणि गांधी कुटुंब वेगळे नाही
सुमारे १८ वर्षे सोनिया गांधी पक्षाचे नेतृत्व करत आहेत. गांधी कुटुंबाशिवाय अन्य कुणाला अध्यक्षपद दिले जाऊ शकत नाही का, या प्रश्नावर आझाद म्हणाले की, गांधी कुटुंबाशिवाय अन्य कोणाला अध्यक्षपद दिल्यास अपेक्षित गोष्ट साध्य होणार नाही. काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय यांना एकमेकांपासून वेगळे केलेच जाऊ शकत नाही. गांधी कुटुंबीयांचा त्याग मोठा आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. तुम्ही ते विसरू शकत नाही, असे नमूद करत प्रत्येक स्तरावर पक्षाला मजबूत करणे गरजेचे आहे. त्याशिवाय काँग्रेसची स्थिती सुधारणार नाही, असे मत आझाद यांनी नोंदवले.
ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी मोठी कारवाई; बेंगळुरूतून दिशा रवि अटकेत
प्रतिमा मलीन होण्याची पर्वा नाही
राज्यसभेतील प्रसंगानंतर माझी प्रतिमा मलीन होईल का, याची मला अजिबात पर्वा नाही. इंदिरा गांधी यांची स्तुती करताना मी अटल बिहारी वाजपेयी यांना पाहिले आहे. इंदिरा गांधी यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांची स्तुती केली होती. अटलजींनी संजय गांधी यांचेही कौतुक केले होते. संजय गांधी यांनी अटलजींवर टीका केली, तरी अटलजींनी त्यांना पाठिंबा दिला होता. यांसारख्या अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. आताच्या घडीचे नेते त्या उंचीवर जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
"केरळमध्ये CAA लागू होणार नाही"; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले स्पष्ट
मोदी पक्के भाजपवाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला निमंत्रित केले का, या प्रश्नावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, मी पक्का काँग्रेसवाला आहे, हे मोदींना माहिती आहे आणि मोदी पक्के भाजपवाले आहेत, हेही मला माहिती आहे. काही झाले, तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, हे त्यांना माहिती आहे, असे आझाद यांनी सांगितले.