काँग्रेस सोडल्यानंतर आझाद दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; धमकीचे पत्र व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:29 PM2022-09-15T14:29:35+5:302022-09-15T14:30:59+5:30
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका संघटनेने धमकी दिली आहे.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आजाद यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. गेल्या काही दिवसांपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सभा-रॅली घेत असून, लवकरच ते आपल्या पक्षाची घोषणा करणार आहेत. यादरम्या आझाद दहशतवादी संघठनेच्या निशाण्यावर आले आहेत. एका संघटनेने आझाद यांना धमकी दिली असून, धमकीचे पोस्टर सोशल मीडियावरही शेअर करण्यात आले आहेत.
धमकीमध्ये काय?
गुलाम नबी यांनी आपल्या मिशन काश्मीरसाठी खोऱ्यात विविध ठिकाणी सभांचे आयोजन केले आहे, यामुळेच ते दहशतवाद्यांचा निशाण्यावर आले आहेत. ‘गद्दाराच्या हृदयात कधीही निष्ठा येत नसते. फक्त प्राणामिकपणा दाखवण्यासाठी नाटक सुरूआहे. हा तर राजकि सरडा आहे,’ असा मजकूर दहशतवाद्यांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये लिहिला आहे.
कोणी दिली धमकी?
ही धमकी 'द रेसिसटेंस फ्रंट टेरर आउटफिट'ने दिली असून, याचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडणे आणि जम्मू-काश्मीरच्या राजकारणात उतरणे योगायोग नाही. पक्ष सोडण्यापूर्वी आझाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असेही धमकीत म्हटले आहे.
राजीनाम्यानंतर राज्यात सक्रीय
गुलाम नबी आझदांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यात अनेक सभा घेत असून, राज्यातील अनेक नेतेही त्यांना पाठिंबा देत आहेत. आझाद यांनी आपला पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे, लवकरच याची अधिकृत घोषणा होईल.