नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर सोमवारी घणाघाती हल्ला चढविला. आजारी काँग्रेसला प्रार्थनेची नाही, तर औषधपाण्याची (दुवा की नहीं, दवा की जरुरत है) गरज असून, दुर्दैवाने हे औषधोपचार डॉक्टरांऐवजी कंपाऊंडर करीत आहेत, असे ते म्हणाले. पक्ष सुरळीत करण्यासाठी नेतृत्वाकडे वेळ नाही. काँग्रेस राज्यांमध्ये असे नेते देत आहे, जे लोकांना पक्षाशी जोडण्याऐवजी संघटना सोडायला लावत आहेत, असेही आझाद यांनी पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल करताना म्हटले.
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते. आपण लवकरच पक्ष स्थापन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर युतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, इतरही पक्ष आहेत.
आझाद यांचा डीएनए मोदीमय झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरून त्यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढविला. नरेंद्र मोदींशी ते लोक मिळालेले आहेत जे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदींनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिलेले आहे. यात जे लोक त्यांची मदत करीत आहेत ते मोदींना मिळालेले आहेत. जे संसदेतील भाषणानंतर मोदींची गळाभेट घेऊन म्हणतात आमचे हृदय स्वच्छ आहे, ते मिळालेले आहेत की नाहीत, असा सवाल आझाद यांनी केला. (वृत्तसंस्था)
राहुल यांची पात्रता नाहीराहुल गांधी यांना राजकारणात रस नाही. त्यांच्यात योग्यताही नाही. आम्ही त्यांना नेता बनविण्याचा प्रयत्न केला. बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांच्याकडे राजकारण करण्याची क्षमताच नाही. मुळात ते याबाबत गंभीर नाहीत, असाही आरोप त्यांनी केला.
मला भाग पाडले...मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले. जी २३ नेत्यांनी पत्र लिहिल्यापासून त्यांना (पक्ष नेतृत्व) माझ्याशी समस्या आहे. आपल्याला कोणी काही लिहू नये, कोणी काही विचारू नये, असे त्यांना वाटते. अनेक बैठका झाल्या. तथापि, एकही सूचना स्वीकारली गेली नाही, असे आझाद यांनी सांगितले.
काँग्रेसचा पाया खिळखिळाकाँग्रेसचा पाया खिळखिळा झाला असून, पक्ष कधीही कोसळू शकतो. त्यामुळे आपण अन्य काही नेत्यांसह पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.