गुलाम नबी आझादांची ताकद आणखी वाढली, काँग्रेस-आपच्या 150+ नेत्यांनी दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 07:38 PM2022-08-31T19:38:28+5:302022-08-31T19:39:11+5:30
काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे.
श्रीनगर:काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या राजीनाम्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी आम आदमी पक्षाच्या (AAP) 51 नेत्यांनी राजीनामा दिला आणि गुलाम नबी आझाद यांच्यासोबत सामील झाले. याशिवाय काँग्रेस पक्षातील 42 नेत्यांनीही बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. हे सर्व नेते आगामी काळात गुलाम नबी आझाद यांना पूर्ण पाठिंबा देणार आहेत.
गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि आपच्या 150 हून अधिक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. या नेत्यांमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद यांचाही समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. गुलाम नबी आझाद नवीन पक्ष काढणार असून, राज्यातील सर्व जागा लढवणार, असे म्हटले जात आहे. मोठे आवाहन आहे.
आझाद नव्या पक्षाची घोषणा करू शकतात
नुकताच गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावेळी त्यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. राहुल गांधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडल्याचे आझाद म्हणाले होते. दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता आझाद स्वत:चा पक्ष काढण्याच्या तयरीत आहेत. 4 सप्टेंबरला जम्मूमध्ये एका सभेला संबोधित करणार आहेत,यावेळी मोठी घोषणा होऊ शकते.