ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंग करत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला तेव्हा या निर्णयातून राजकीय नेते आणि सरकारी अधिकार-यांना एक सक्त आदेशदेखील मिळाला आहे. 'पब्लिक सर्व्हंट म्हणजे जनतेचे सेवक आपल्याला मिळणा-या भेटवस्तूंचा उल्लेख कायदेशीर कमाई म्हणून करु शकत नाही', असं न्यायालयाने सांगितलं आहे. 'जयललिता यांना मिळालेल्या भेटवस्तू बेकायदेशीर असून, त्यांनी कायदेशीर स्वरुपात कमावलेली संपत्ती दाखवण्याचा प्रयत्न करणे चुकीचं असल्याचं', न्यायाधीश पिनाकी चंद्र आणि अमिताव रॉय यांनी सांगितलं आहे.
'भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आल्यामुळे आणि जनतेचे सेवक यांची व्याख्या स्पष्ट झाल्यानंतर जयललिता यांच्या जन्मदिनी मिळालेल्या भेटवस्तू कायदेशीर मार्गाने कमावलेल्या संपत्तीचा भाग असणे हा बचाव पक्षाचा दावा न्यायालयीनदृष्ट्या अमान्य असल्याचं', न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बाजूने केस लढणा-या वकिलांनी न्यायालयात 'जर कोणी योग्य माहिती देत असेल, आणि कर चुकता करत असेल, तर आयकर विभाग भेटवस्तू घेणं अपराध मानत नाही', असा दावा केला होता. जयललितांच्या बाबतीच हाच मुद्दा ग्राह्य धरला जावा अशी मागणीही त्यांनी न्यायालयात केली. मात्र न्यायालयाने त्यांचा हा दावा फेटाळत, 'जयललिता किंवा अन्य लोकांकडून आयकर परताव्यात या भेटवस्तूंचा उल्लेख करणे आणि त्यावरील कर भरण्याने अशा भेटवस्तू घेणं कायदेशीररित्या मान्य केलं जाऊ शकत नाही. त्यांच्यावर लावलेले आरोप या आधारे हटवले जाऊ शकत नाहीत', असं म्हटलं आहे.
शशिकला अखेर भ्रष्टाचाराबद्दल झालेली शिक्षा भोगण्यासाठी बुधवारी सायंकाळी तुरुंगात गेल्या. त्या कैदी नंबर ९४३५ असतील. वातानुकूलित खोली द्यावी तसेच घरचे जेवण आणि बाटलीबंद पाणी, अशी मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यांना साध्या कैदी म्हणून अन्य दोन महिलांसह एका बराकीत पुढील काळ घालवावा लागणार आहे. तसेच इतर कैद्यांना दिले जाणारे जेवणच त्यांनाही मिळेल.
सरकारी पाहुणे म्हणून शशिकला, इलावरसी आणि सुधाकरन या तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली. अपिलाच्या काळात ३३ दिवस कारावास भोगून झाला असल्याने शशिकला यांचा मुक्काम पुढील तीन वर्षे ११ महिने बंगळुरूच्या या तुरुंगात असेल.
शशिकला कमावणार दिवसाला ५0 रुपये -
शशिकला यांना कारागृहात रोज मेणबत्त्या व उदबत्त्या तयार करण्याचे काम देण्यात येणार असून, त्यासाठी त्यांना रोज ५0 रुपये पगार मिळेल. त्यांना रविवारीही सुटी नसेल. कारागृहात नेसण्यासाठी त्यांना प्रशासनातर्फे तीन सुती साड्या देण्यात आल्या आहेत. अन्य कैद्यांप्रमाणेच त्यांना तुरुंगात वागणूक मिळेल आणि व्हीआयपी म्हणून वागविले जाणार नाही.