वॉशिंग्टन - प्रसूतीनंतर काही महिला चिडचिड्या होतात. त्यांच्यावरील मानसिक ताण वाढतो. त्याला पोस्टपार्टम असे म्हणतात. त्यावर तयार केलेल्या जुजुर्वे या नव्या औषधास अमेरिकेच्या फुड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) मंजुरी दिली आहे. अतिशय निराश असलेल्या रुग्णालाच हे औषध देण्यात येते व ते १४ दिवस घ्यावे लागते, असे संशोधकांनी सांगितले.
एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस विभागाच्या संचालक डॉक्टर रुशी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गर्भवती असताना तसेच प्रसूती झाल्यानंतर काही महिला विशिष्ट कारणांनी निराश होतात. या आजाराच्या लक्षणांकडे पूर्वी फारसे लक्ष दिले जात नव्हते किंवा लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचे टाळत असत. प्रसूतीनंतर निराशावस्थेत असलेल्या महिलांच्या मनात कधीकधी आत्महत्येचेही विचार येतात. त्यांच्या मनावरचा ताण दूर करणारे प्रभावी औषध तयार करणे आवश्यक होते. ती कमतरता जुजुर्वे या औषधाने भरून काढली आहे. (वृत्तसंस्था)
असे आहेत काही दुष्परिणाम- अमेरिकेच्या एफडीएने सांगितले की, जुजुर्वे गोळीचे काही दुष्परिणामही आहेत. - ही गोळी घेतल्यानंतरचे पुढील १२ तास त्या रुग्णाने खूप शारीरिक कष्ट असलेले कोणतेही काम करू नये तसेच त्याला वाहन चालविण्यासही मनाई करण्यात आली आहे. - जुजुर्वे गोळी घेतल्यानंतर चक्कर येणे, थकावट, सर्दी, खोकला, मूत्रसंसर्ग असे काही दुष्परिणाम होऊ शकतात. - मात्र निराशा दूर करण्यासाठी घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम फार काळ टिकत नाही. त्यामुळे चिंतेचे कारण उरत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
‘औषधाचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर नको’स्तनपान करणाऱ्या महिलांवर जुजुर्वे या औषधाची चाचणी झाली आहे किंवा नाही याबद्दल अजून नीटशी माहिती उपलब्ध झालेली नाही. हे औषध मानसोपचार तज्ज्ञांनी रुग्णाला लिहून देणे योग्य आहे. पण सर्वच डॉक्टर सरसकट हे औषध घेण्याचा सल्ला देऊ लागले तर जुजुर्वेचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होण्याचा धोका आहे. त्यातून आणखी काही वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी वैद्यकीय तज्ज्ञांना भीती वाटते.