बिपरजॉय वादळाचा धोका; गिर जंगलातील 100 सिंहाना सुरक्षित स्थळी हलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 03:17 PM2023-06-13T15:17:17+5:302023-06-13T15:18:46+5:30
gir lion biporjoy cyclone: बिपरजॉय वादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये दिसायला लागला आहे.
gir lion biporjoy cyclone: अरबी समुद्रात निर्माण झालेले 'बिपरजॉय चक्रीवादळ' वेगाने भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये दिसायला लागला आहे. समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत. धोका पाहता तिन्ही राज्य सरकारे अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर जंगलावर या वादळाचा परिणाम दिसून येत असून, 100 सिंहांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
गिर सफारी बंद
300 ट्रॅकर्सच्या माध्यमातून सिंहांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ट्रॅकर्सच्या मदतीने सिंहांना होणारा संभाव्य धोका आधीच ओळखता येतो. त्यामुळे वेळीच सिंहांचे प्राण वाचू शकतात. वादळामुळे 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहू शकतात. कोणत्याही वन्यप्राण्यांना इजा होऊ नये यासाठी वनविभाग ठोस व्यवस्था करत आहे.
आराधना साहू(CCF जुनागड) यांनी सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळाच्या विनाशकारी प्रभावामुळे गिर जंगल सफारी आणि देवलिया पार्क 12 ते 16 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. गीर सफारीमध्ये 16 जूनपासून 4 महिन्यांची पावसाळी सुट्टी सुरू होत आहे. आता गिर सफारी 16 ऑक्टोबरलाच सुरू होईल.
यापूर्वी वादळात मोठे नुकसान झाले होते
धोका लक्षात घेता वादळाच्या काळात कोणालाही गीर जंगलात जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हे वादळ संपताच देवलिया पार्क सुरू करण्यात येईल. गीरच्या जंगलात आलेल्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती. अशा स्थितीत प्रशासन यावेळी आधीच सतर्क झाले आहे. धोका ओळखून गीर सफारी आधीच बंद करण्यात आली आहे.