ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून आज संसदेत गदारोळ माजल्लायानंतर भाजपा खासदार गिरीराज सिंह यांनी माफी मागितली. 'माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो' असे सिंह यांनी सांगितले. सिंह यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. तसेच याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही केली. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर सिंह यानी त्यांच्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली.
'सोनिया गांधी या गो-या असल्यामुळे त्यांना काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले, राजीव गांधींनी नायजेरियन मुलीशी लग्न केले असते तर तिला अध्यक्ष केले नसते' असे वर्णद्वेषी तसेच सोनियांवर वाईट भाषेत टीका करणारे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले होते. या वक्तव्यावरून सिंह यांच्यावर देशभरातून टीका होत असतानाच नायजेरियातर्फेही या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे व ज्योतिरादित्य शिंदे यांनी सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ' सिंह यांचे वक्तव्य हे महिलाविरोधी असून महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही, सिंह यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.