सिक्कीम - भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था असलेली गिरिप्रेमी यातील गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे उंच शिखर आणि भारतातील सर्वात उंच शिखर सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 8 हजार 596 मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा शिखर जगातील उंचीनुसार तिसरे शिखर आहे. या शिखरावर खूप कमी मोहिमा केल्या जातात. आत्तापर्यंत 400 गिर्यारोहकांनी या शिखरावर चढाई केली आहे.
पुण्यातील गिरिप्रेमींनी सातवी अष्टहजारी शिखर सर करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. सहा यशस्वी मोहिमेनंतर गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली 10 गिर्यारोहकांच्या चमुने कांचनजुंगा शिखरावर चढून तिरंगा फडकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सकाळी 6 च्या सुमारास गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली. इको प्रोजेक्ट हे या कांचनजुंगा मोहिमेचे वैशिष्ट आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेले संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले नमुने या मोहिमेत गोळा करण्यात आले आहेत.
गिरिप्रेमींसाठी कांचनजुंगा मोहीम ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम होती. या चढाईच्या दरम्यान अतिउंचावरील माती आणि दगड गोळा करण्याचे कामही गिर्यारोहकांकडून करण्यात आले. कांचनजुंगा शिखर चढणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड असते. गिरिप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी आज सकाळी ही यशस्वी शिखर चढाई केली. पुण्याची ही टीम मार्च अखेरीस काठमांडूकडे रवाना झाली होती.