पाटणाः भाजपा कार्यकर्ते आणि समर्थक केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना बिहारचे पुढील मुख्यमंत्र्यांच्या रुपात पाहत आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर रविवारी गिरिराज सिंह बेगुसराय या स्वतःच्या मतदारसंघात पोहोचले. त्यानंतर सिंह यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं. 'अगला मुख्यमंत्री कैसा हो, गिरिराज सिंह जैसा हो', अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. तर भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलं की, पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक गिरिराज सिंह यांच्याकडे बिहारच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपात पाहतात.गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि मोदींमध्ये दुरावा वाढत चालला आहे. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली असून, पुरेशी मंत्रिपदे न मिळाल्याने मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपाला आज अजून एक धक्का दिला आहे. भाजपाशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवताना बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे.जेडीयूने एनडीएतील आपल्या सहभागाबाबत मोठी घोषणा केली आहे. भाजपासोबतची एनडीएमधील आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवण्याची आणि बिहारबाहेर एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम न करण्याची घोषणा जेडीयूने केली. त्यामुळे जेडीयू आणि भाजपाची आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित राहणार आहे. तर बिहारबाहेर जेडीयू स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आगामी वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यात जेडीयू स्वबळावर लढणार आहे. येत्या काळात भाजपा आणि जेडीयूमधील दरी आणखी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'अगला मुख्यमंत्री कैसा हो, गिरिराज सिंह जैसा हो', बेगुसरायमध्ये गिरिराज पोहोचताच घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:45 PM