नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत काही वादग्रस्त वक्तव्य पक्षाला त्रासदायक ठरल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यानंतर भाजपमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर लक्ष ठेवले जाणार हे स्पष्ट झाले होते. त्याचीच प्रचिती वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना आली आहे.
खासदार गिरीराज सिंह कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या एका वक्तव्यांची दखल घेत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डी यांनी त्यांनी समन्स बजावले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात गिरीराज यांनी शाहीन बाग आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. शाहीन बाग मधील आंदोलन आता आंदोलन राहिले नसून येथे सुसाईड बॉम्बर तयार केले जात आहेत. देशाच्या राजधानीत देशाविरुद्ध योजना बनविली जात आहे. शाहिन बागेत एका महिलाचा मुलगा थंडीने मृत्यूमुखी पडला. मात्र ते त्याला शहीद म्हणत आहेत. हा सुसाईड बॉम्बच आहे, असं गिरीराज म्हणाले होते.
या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, देवबंदमध्ये आतंकवादाची गंगा वाहत आहे. हाफीस सईद याच्यासारखे मोठ मोठे आतंकवादी येथून निघतात. या वक्तव्याची भाजप अध्यक्षांनी दखल घेत केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना समन्स बजावले आहे.