ऑनलाइन लोकमत
मोगा (पंजाब), दि. ३० - धावत्या बसमध्ये कंडक्टरच्या साथीदाराने केलेल्या छेडछाडीनंतर भीतीपोटी ३५ वर्षीय महिलेने तिच्या १३ वर्षाच्या मुलीसोबत बसमधून उडी मारल्याची घटना पंजाबमधील मोगा येथे घडली. यात जखमी झालेल्या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ही बस पंजाबचे मुख्यमंत्री सुखबिर बादल यांच्या मालकीची असल्याचे समजते.
पंजाबमध्ये राहणारी ३५ वर्षीय महिला तिच्या १३ वर्षाची मुलगी व लहान मुलासोबत माहेरी जाण्यासाठी निघाली होती. बसमधून प्रवास करत असताना मोगा शहराजवळ बसमध्ये सहाय्यक बस कंडक्टरने महिलेशी असभ्य वर्तन करत तिची छेडछाड सुरु केली. महिलेने हा प्रकार बस कंडक्टरला सांगितला असता त्याने आपल्या सहका-याचीच बाजू घेतली. अखेरीस ती महिला बसचालकाकडे गेली व तिने बस थांबवण्यास सांगितले. मात्र बसचालकाने बस न थांबवता आणखी वेगाने बस पळवणे सुरुच ठेवले. या सर्व प्रकारानंतर भयभीत झालेल्या महिलेने छेडछाड टाळण्यासाठी धावत्या बसमधून मुलीला सोबत घेऊन उडी मारली. तर तिचा लहान मुलगा हा बसमध्येच होता. दुर्दैवी बाब म्हणजे हा सर्व प्रकार सुरु असताना बसमध्ये काही प्रवासी उपस्थित होते. या प्रवाशांनी महिलेला कोणतीही मदत केली नाही असे समजते. महिला उडी मारत असताना स्थानिक रहिवाशांनी बघितले व त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बस थांबवली. संतप्त ग्रामस्थ बसजवळ येताच बसचालक, मुख्य कंडक्टर व सहाय्यक कंडक्टर यांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. स्थानिकांनी महिला व तिच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र लहान मुलीला गंभीर जखमा झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेत पोलिसांनी तिघा जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
महिला ज्या बसमधून प्रवास करत होती ती बस ऑर्बिट एव्हिएशन या कंपनीची आहे. ही कंपनी पंजाबचे मुख्यमंत्री सुखबिर बादल यांच्या मालकीची असून संबंधीत बस ही सार्वजनिक उपक्रमासाठी भाडेतत्वावर देण्यात आली होती.