बिहारच्या बांका जिल्ह्यातील अमरपूर परिसरातील पवई गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरल्यानंतर एका मुलीने तिच्या भावी पतीचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतर मुलाने रागाच्या भरात एक भयंकर पाऊल उचललं. कीटकनाशक प्राशन करून तो एका टेकडीवर जाऊन झोपला. त्याला रेफरल हॉस्पिटल येथे आणण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आलं. तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत.
पवई गावातील रहिवासी मिथुन कुमार दास याचं लग्न भलूआर गावातील एका मुलीसोबत ठरलं होतं. यानंतर मुलगा आपल्या भावी पत्नीशी बोलण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. मुलीचा फोन अनेक वेळा वाजला, पण समोरून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर फोन केल्यावर कळलं की, मुलीने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. यामुळे संतापलेल्या तरुणाने असं काही केलं, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
तरुणाने कीटकनाशक प्राशन केलं. गावातील काही लोकांनी त्याला बराच वेळ टेकडीवर झोपलेलं पाहिलं. त्यानंतर त्याला खाली आणलं. कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये तरुणाची आई इनवा देवी सांगतात की, त्यांच्या मुलाचं लग्न भलूआर गावात ठरलं होतं.
मुलाला त्याच्या भावी पत्नीशी बोलायचं होतं, परंतु मुलगी अभ्यासाचं कारण देत त्याच्याशी बोलण्यास नकार देत होती. सोमवारी संध्याकाळी तो टेकडीकडे गेला असता दोघांमध्ये फोनवरून भांडण झालं. यानंतर मुलाने विषारी द्रव्य प्राशन केलं. तरुणाच्या मित्रांनी सांगितलं की, तो मुलीच्या आईसोबत बोलत होता.
मुलीच्या आईने त्याला सांगितलं की, त्यांची मुलगी सध्या मॅट्रिकच्या परीक्षेची तयारी करत आहे. लग्न पुढच्या वर्षी होणार आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मुलीने त्याचा फोन नंबर ब्लॉक केला. या सर्व प्रकारानंतर तरुणाने गुपचूप कीटकनाशक प्राशन केलं आणि टेकडीवर जाऊन झोपल्याचं समोर आलं आहे.