हैदराबाद - आई ओरडली या क्षुल्लक कारणामुळे इंजिनीअरिंग शिकणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आपल्या आनंदी होण्याची भीती वाटत असल्याचं लिहिलं होतं. घरी कोणी नसताना तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मोनिका असं या तरुणीचं नाव असून ती 21 वर्षांची होती.
तरुणीने आत्महत्या करण्याआधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आत्महत्येचं कारण सांगितलं. 'या दिवसांमध्ये मला आनंदी राहण्याची भीती वाटू लागली आहे. मला माहित नाही...पण जेव्हा मी माझ्या आयुष्यात आनंदी असते तेव्हा कोणालाच माझ्याकडे लक्ष देण्याची इच्छा नाही. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण वाया जात आहे', असं मोनिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिलं होतं. यावेळी तिने सॅड स्माईलीदेखील वापरल्या होत्या.
दुसरीकडे हैदराबादमध्येच एका व्यक्तीने आधी व्हिडीओ रेकॉर्ड केला, नंतर आत्महत्या केली. रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आपले काही नातेवाईक पैशांसाठी धमकावत असल्याचा आरोप व्यक्तीने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद हुसेन यांनी आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओत शाहिद हुसेन गळ्याभोवती फास लावून बोलत असल्याचं दिसत आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली आहे. शाहिद हुसेन यांनी आत्महत्येसाठी आपल्या नातेवाईकांना जबाबदार धरलं आहे. आपण घेतलेले पैसे परत मिळावेत यासाठी नातेवाईक वारंवार धमक्या देत होते असा आरोप शाहिद हुसेन यांनी केला आहे.
तिस-या प्रकरणात एका 12 वर्षीय विद्यार्थिनीने अभ्यासाचा तणाव असल्याने आत्महत्या केली आहे. माधमपूर परिसरातील ही घटना आहे. राहत्या घरी तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.