ऑनलाइन लोकमत
नैनीताल, दि. 25- नैनीतालमध्ये रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करताना एक दहा वर्षाची मुलगी दरीत पडल्याची घटना घडली आहे. ही मुलगी राजस्थानची रहिवासी असून तीच्या कुटुंबीयांसोबत नैनीतालमध्ये फिरायला गेली होती. दरीत पडल्याने त्या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केलं आहे. अमतुल असं त्या मुलीचं नाव असून ती तिच्या कुटुंबीयांसह नैनीतालमध्ये फिरायला गेली होती. तेथे दोन दिवसांची सुट्टी घालविल्यानंतर घरी जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडत असताना ही घटना घडली आहे.
तल्लीताल बस स्थानकावर जात असताना रस्त्यावर काही भटक्या कुत्र्यांची झुंबड आली होती. ते कुत्रे भुंकायला लागले आणि अमतुलच्या दिशेने धावत येत होते. त्यावेळी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अमतुल पळाली आणि 30 फुट खोल दरीत पडली, अशी माहिती तिचे वडील अब्बास फकरूद्दीन यांनी दिली आहे. दरीत पडल्याने अमतुलच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी हल्व्दानीच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. अमतुल ब्रेन डेड झाली असून तिच्या डोक्याने काम करणं बंद केल्याचं, तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर अजय पाल यांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे नैनीतालच्या डोंगराळ भागात भटक्या कुत्र्यांचा असलेला अती वावर पुन्हा उजेडात येतो आहे.
आणखी वाचा
2016 पासून तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नैनीतालमध्ये कुत्रा चावल्याच्या 774 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर 2015 मध्ये एकुण 1093 तक्रारी होत्या. नैनीताल महापालिकेच्या माहितीनुसार नैनीताल भागात जवळपास 2 हजार भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी 2016 मध्ये पशु जन्म दर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. जानेवारी 2015मध्ये नैनीतालमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे वाढलेले धोके उत्तराखंड हायकोर्टाने निदर्शनास आणून दिले होते. 2012, 2013 आणि 2014 या तीन वर्षाच्या काळात कुत्र्याने लोकांना चावल्याच्या 4000 घटना घडल्याचं कोर्टाने म्हंटलं होतं. या घटना टाळण्यासाठी तात्काळ पावलं उचण्याचे आदेशही कोर्टाने राज्य सरकारला दिले होते.