नवी दिल्ली: 'जाको राखे साईंया मार सके न कोय' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. अशीच काहीशी घटना भोपाळच्या एका महिलेसोबत घडली. महिला उभ्या असलेल्या मालगाडीखालून रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना मालगाडी पुढे जाऊ लागली. अचानक गाडी चालु झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले पण नंतर असे काही घडले ज्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
रेल्वे सुरू होताच महिला घाबरली, तिला काय करावे काहीच सूचत नव्हते. तेवढ्यात महिलेला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने ट्रॅकवर उडी मारली आणि तोही महिलेसोबत रेल्वेखाली झोपला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडिओ काढला. व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, लोक त्या व्यक्तीचे आणि त्याच्या धाडसी कृत्याचे कौतुकत करत आहेत.
ही घटना भोपाळमधील बारखेडी येथील आहे. महिला थांबलेल्या मालगाडीखालून ट्रॅक ओलांडत असताना रेल्वे सुरू होते आणि ती त्यात अडकून पडते. यादरम्यान मुहम्मद मेहबूब नावाच्या व्यक्तीने ट्रॅकवर उडी मारली आणि महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने महिलेला पकडून ठेवले. यावेळी ट्रेन दोघांच्या अंगावरुन गेली, मात्र दोघेही सुखरुप बाहेर आले.