फिरोजाबाद:उत्तर प्रदेशातडेंग्यूच्या साथीने मागील काही दिवसात अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी योगींनी आजारी मुलांना योग्य त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. पण, तरीदेखील येथील एका चौदा वर्षीय मुलीचा उपचाराविना मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिरोजाबादमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे एक शंभर खाटांचे रुग्णालय आहे. साथीच्या आजाराने याच रुग्णालयातील 40 मुलांचा मृत्यू झाला होता. या मुलांसह एका 14 वर्षीय कोमल नावाच्या मुलीलाही दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिच्या आईने मुख्यमंत्र्यांकडे विशेष उपचार देण्याची विनंती केली होती. त्यानंतर योगींनी त्या मुलीची विशेष काळजी घेण्याचे निर्देश संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिले होते.
'उपचार मिळाला नाही...'30 ऑगस्टला भरती केलेल्या कोमलची उपचारादरम्यान अचानक तब्येत बिघडली. यानंतर तिला दुसऱ्या दिवशी अलीगडमधील रुग्णालयात घेऊन जात होते, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणा आणि योग्य उपचार न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, कोमल ही एकटीच नसून, तिच्यासारख्या अनेक मुलांनी योग्य उपचाराविना आपला जीव गमावला आहे.