उत्तर प्रदेशातील बलिया येथे 24 वर्षीय तरुणीने प्रियकराला भेटण्यासाठी चक्क सायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. गुजरातला जाण्यासाठी घराबाहेर पडली. तरुणीने फेसबुकवर या तरुणाशी मैत्री केली होती, त्यानंतर ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी घरातून निघून गेली, मात्र त्याच दरम्यान तिच्या फोनची बॅटरी लो झाली आणि तिने काही स्थानिक व्यावसायिकांची मदत घेतली.
तरुणीने ती परीक्षा देण्यासाठी प्रयागराजला जात असल्याचं सांगितलं. परंतु जेव्हा व्यापाऱ्यांना तिच्यावर संशय आला तेव्हा त्यांनी तिच्या बॅगची झडती घेतली, ज्यामध्ये त्यांना वधूचे कपडे आणि काही दागिने सापडले. व्यापाऱ्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना मुलीची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना बोलावले. घटनास्थळी पोहोचलेल्या तिच्या पालकांनी ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा दावा केला. त्यानंतर पोलिसांनी तरुणीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
सायकलने जात होती गुजरातला
स्टेशन ऑफिसर बान्सडीह रोड राज कपूर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलीची चौकशी सुरू केली तेव्हा तिने सुरुवातीला प्रयागराज येथे परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तिला विचारले असता चौकशी सुरू असताना तिने कबुली दिली. ती तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी सुरतला जाण्यासाठी घरातून निघाली होती.
तरुणीने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सुरतमधील एका तरुणाच्या संपर्कात आली होती. संभाषणानंतर, तिने त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्याने कामामुळे येण्यास नकार दिला. यानंतर तरुणीने 17 जानेवारी रोजी तिच्या सायकलवरून वधूच्या पोशाखासह इतर काही सामान असलेली बॅग घेऊन सुरतला जाण्याचा निर्णय घेतला. सकाळपासून तिचा शोध सुरू असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. पोलिसांनी तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"