मथुरा - योग्यरित्या वापर केल्यास सोशल मीडिया हा आणीबाणीच्या प्रसंगात मदतगार ठरू शकतो. अशीच एक घटना मथुरा येथे घडली आहे. येथे एका तरुणीने केलेल्या ट्विटची दखल घेत पोलिसांनी तिच्या हरवलेल्या वडिलांना शोधून काढले. या संदर्भातील सविस्तर हकिकत अशी की, मुंबईत राहणाऱ्या तमन्ना गुप्ता यांनी ट्विट करून आपल्या वडलांना मदत करण्याची विनंती केली होती. माझ्या वडलांनी मला नुकताच फोन करून आपण मथुरा येथील गोवर्धन येथे आहोत असे सांगितले आहे. तुम्ही त्यांना तात्काळ मदत करू शकता का? अशी विचारणा करत तमन्ना यांनी हे ट्विट उत्तर प्रदेश पोलीस, मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला टॅग केली होती. तमन्ना यांनी वडलांना मदत करण्यासाठी केलेले विनंतीपर ट्विट पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासास सुरुवात केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आयजी रेंज आक्र आणि एडीजी झोन आग्रा यांना हे ट्विट टॅग करून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले. त्यानंतर मथुरा पोलिसांनी गोवर्धन पोलीस ठाण्यास आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे या ट्विटला उत्तर देताना सांगितले. तसेच आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांस हरवलेल्या राधेश्याम गुप्ता यांना छायाचित्राच्या मदतीने शोधून काढण्याचे आदेश दिले. अखेर हरवलेले राधेश्याम गुप्ता हे मथुरा येथील गोवर्धन येथे सापडले. वडील राधेश्याम गुप्ता हे बेपत्ता झाल्यानंतर मुलगी तमन्ना हिने ट्विटरवर फाइंड माय फादर हा हॅशटॅग बनवून त्यांचा एक फोटो ट्विट केला. तसेच त्यांचा शोध घेण्यास मदत करण्याचे आवाहन केले. 66 वर्षीय राधेश्याम गुप्ता हे मुंबईजवळील नालासोपारा येथे शेवटचे दिसले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. मात्र अखेरीस ते मथुरा येथे सापडले. वडील सापडल्यानंतर तमन्ना यांनी सर्वांचे आभार मानले. विशेषत: उत्तर प्रदेश पोलीस, मथुरा पोलीस आणि गोवर्धन पोलिसांचे त्यांनी विशेष आभार मानले. तसेच याचे श्रेय त्यांनी डिजिटल इंडियालाही देत हे ट्विट पीएमओलाही टॅग केले.