नवी दिल्लीः राजधानीतल्या न्यू अशोक नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह दिल्लीपासून 100 किलोमीटर दूरवरच्या अलिगडमधील नाल्यात फेकून देण्यात आला. सुरुवातीला हे प्रकरण ऑनर किलिंगचं असल्याचं वाटत होतं. परंतु कुटुंबीयांनी समान गोत्रातील मुलाशी विवाह केल्यानं तिची हत्या केल्याची बाब समोर आली. या प्रकरणात न्यू अशोक नगर पोलिसांनी आईवडिलांसह सहा लोकांना अटक केली. मृत मुलीची ओळख शीतल चौधरी या नावानं झाली आहे. मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाला कारमधून नेऊन अलिगडला फेकून देण्यात आलं. कुटुंबीयांना मुलीचं शेजारील तरुणाशी मैत्री असल्याचा संशय होता. तसेच त्या तरुणाचं लग्न झालेलं असतानाही आर्य समाज मंदिरात त्याच्याशी तिनं विवाह केला होता. जेव्हा शीतलचा मोबाइल सापडला नाही, तेव्हा न्यू अशोक नगर ठाण्यात त्या तरुणीच्या शेजारील मित्रानं कुटुंबीयांविरोधात तक्रार देत संशय व्यक्त केला. घटनेच्या 22 दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्या मुलीची आई सुमन, वडील रवींद्र, काका संजय, आत्येचा नवरा ओमप्रकाश, आत्येचा मुलगा परवेश आणि रवींद्रचा दुसरा जावई अंकितला अटक केली. कुटुंबीयांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे.तिला समजवल्यानंतरही ती लग्न मोडण्यास तयार नव्हती, अखेर त्यांनी तिची हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, शीतल कुटुंबीयांसह न्यू अशोक नगर भागात राहत होती. कुटुंबीयांच्या शेजारीच तिचा मित्र राहत होता. त्या दोघांमध्ये तीन वर्षं खोलवर मैत्री होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांनी कुटुंबीयांना कळू न देता लग्न केलं होतं. परंतु यासंदर्भातही कोणालाच माहिती नव्हती. 30 जानेवारीनंतर तिच्या मित्राची शीतलबरोबर भेट झालेली नाही. त्यानं पहिल्यांदा आजूबाजूला शोध घेतला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन 17 जानेवारीला अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास केला असता, ती आत्येच्या घरी गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी आत्येचं घर गाठलं, तिथेसुद्धा ती नव्हती. पोलिसांना कुटुंबीयांवर संशय आला. मुलीची सर्व कॉल रेकॉर्ड मिळवले. त्यानंतर एक एक साखळी जोडत गेली. कडक तपासानंतर हे सत्य समोर आलं. 30 जानेवारीलाच तिची हत्या करून मृतदेह अलिगडच्या नाल्यात टाकण्यात आला होता. ते दोन कार घेऊन अलिगडला गेले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांनाही 30 जानेवारीला नाल्यात मृतदेह सापडला होता. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला तिच्यावर अंतिम संस्कार केले होते, परंतु शीतलच्या कपडे आणि फोटोंवरून यूपी पोलिसांनी तिला ओळखलं.
समान गोत्रात विवाह केल्याच्या कारणास्तव मुलीची हत्या; कुटुंबीयांनी मृतदेह 100 किमी दूर फेकला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 1:49 PM
राजधानीतल्या न्यू अशोक नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ठळक मुद्देराजधानीतल्या न्यू अशोक नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह दिल्लीपासून 100 किलोमीटर दूरवरच्या अलिगडमधील नाल्यात फेकून देण्यात आला. कुटुंबीयांनी समान गोत्रातील मुलाशी विवाह केल्यानं तिला मारून टाकल्याची बाब समोर आली.