गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. आर्थिक गणित कोलमडल्यामुळं सर्वसामान्यांचे जगणंही कठीण झालं आहे. यात कोरोनामुळे शाळा बंद पडल्यात. आधुनिक शिक्षणाच्या सहाय्याने अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु आजही कित्येक गरिबांच्या मुलांना स्मार्टफोन नसल्यानं ऑनलाईन शिक्षणापासून मुकावं लागत आहे.
अशीच एक कहानी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, झारखंडमधील जमशेदपूर येथे राहणाऱ्या एका मुलीची. या ११ वर्षीय मुलीकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्टफोन नाही. परंतु रस्त्यावर आंबे विकून ही तरून स्मार्टफोनसाठी पै पै जमा करत आहे. नेहमीप्रमाणे आजही ती रस्त्यावर आंबे विकण्यासाठी बसली होती. परंतु आज जे घडलं त्यामुळे तिच्या आयुष्याला गती मिळाली हे नक्की. रस्त्यावर आंबे विकणाऱ्या तुलसी कुमारीकडे एक ग्राहक आंबे खरेदी करण्यासाठी आला.
अमेय नावाच्या या ग्राहकानं तुलसीकडून १ लाख २० हजारांना चक्क १२ आंबे खरेदी केले. प्रति आंबा १० हजार या रुपयाने अमेयने या मुलीकडून आंबे विकत घेतले. हे पैसे अमेयने मुलीचे वडील श्रीमल कुमार यांच्या खात्यावर जमा केले. व्हॅल्यूएबल एड्युटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा अमेय मॅनेजिंग डायरेक्टर आहे. एका स्थानिक माध्यमातून अमेयला ११ वर्षीय तुलसी कुमारीच्या संघर्षाची बातमी समजली. घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्याच पुढील शिक्षण घ्यायचंय पण स्मार्टफोन नसल्यानं ऑनलाईन क्लासला मुकावं लागत आहे हे अमेयला कळालं. त्यानंतर अमेयने या मुलीला मदत केली.
तुलसी कुमारी म्हणाली की, स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे नसल्याने मी आंबे विकून पैसे जमा करत होती. पण आता माझ्याकडे पैसे आले आहेत. मी ऑनलाईन क्लास अटेंड करू शकते आणि पुढील शिक्षणही घेऊ शकते असं तिने सांगितले. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची परिस्थिती आली. रोजगार ठप्प झाले. त्यात गरिबीमुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेणं परवडत नसल्याने अनेकांनी शाळा सोडल्या. मात्र अमेयसारखे अनेकजण पुढाकार घेऊन आजही मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.