इंदूर – रस्त्यावरील खड्डे ही समस्या केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही तर देशात अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेल्याचं दिसून आलं आहे. अलीकडेच इंदूरमध्ये शनिवारी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या युवतीचा खड्ड्याने बळी घेतला आहे. सरिता रणदा असं या युवतीचं नाव आहे. सरिता भाऊ राहुल आणि मैत्रिण सुजातासोबत स्कूटरवरुन जात होते तेव्हा ही दुर्घटना घडली.
पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्यामुळे पाण्याने भरलेला खड्ड्यात दुचाकीचं पुढचं चाक गेले आणि तिघंही एकमेकांवर पडले. या अपघातात सुजाता गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. २१ वर्षीय सरिता रणदा राहुल आणि सुजातासोबत खंडवा नाका इथं येत होती. पावसामुळे स्कूटरचं चाक एका खड्ड्यात पडलं त्यानंतर सरिता आणि सुजाता खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सरिता बेशुद्ध पडली होती. राहुलने तिला हॉस्पिटला नेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर सुजाताची अवस्था गंभीर आहे. राहुलला किरकोळ दुखापत झाली आहे.
१५ मिनिटं लोकांची मदत मागत राहिला परंतु...
राहुलने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरिता गुजराती कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्गाला शिकायला होती. सुजातासोबत ती मूसाखडी इथं भाड्याने खोली घेऊन राहत होती. मी होळकर सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. मी राहायला खंडवा नाका परिसरात आहे. सरिताच्या घरी संध्याकाळी पाणी येत नव्हते म्हणून सुजाता आणि सरिता यांना घेऊन मी खंडवा नाका येथील माझ्या रुमवर घेऊन येत होतो. रिंगरोडवर पावसामुळे बरेच मोठे खड्डे पडले आहेत. मी खूप काळजीनं स्कूटर चालवत होतो परंतु पाण्याने भरलेला खड्डा न दिसल्याने स्कूटरचं पुढचं चाक पाण्यात गेले आणि माझं नियंत्रण सुटलं असं त्याने सांगितले.
स्कूटर खड्ड्यात पडली असता मी एका बाजूला पडलो आणि सरिता, सुजाताही कोसळल्या. सरिता बेशुद्ध झाल्याने जवळपास १५ मिनिटं आम्ही लोकांकडे मदत मागत होतो. त्यानंतर एक प्रवासी त्याठिकाणी थांबला त्याने रिक्षावाल्याला थांबवलं. मी तात्काळ सरिताला घेऊन भंवरकुआ येथील हॉस्पिटलला उपचारासाठी आणलं परंतु ५ मिनिटांनी डॉक्टर म्हणाले, सरिताचा मृत्यू झाला आहे. तर सुजाताला त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. अशी माहिती राहुलनं दिली.