मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आले आहे. भावा-बहिणीच्या भांडणात बहिणीने मोबाईल गिळला आहे. या घटनेनंतर मुलीला ग्वाल्हेरच्या जयआरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या पोटातील फोन बाहेर काढण्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. वाद सुरू होताच बहीण संतापली आणि तिने फोन गिळला. रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.
मोबाईल गिळताच मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या. मुलीची अवस्था पाहून तिच्या कुटुंबीयांनी वेळ वाया घालवला नाही. तिला ग्वाल्हेरच्या रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉ. प्रशांत श्रीवास्तव, डॉ. प्रशांत पिपरिया आणि डॉ. नवीन कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली कुशल डॉक्टरांचे पथक कामाला लागले.
मुलीचे अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि सीटी स्कॅनसह इतर तपासण्या सुरू करण्यात आल्या. एंडोस्कोपी किंवा लेप्रोस्कोपीद्वारे फोन काढता आला नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या पोटातील फोन बाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया पथकाने जवळपास दोन तास अथक परिश्रम घेतले. डॉ.कुशवाह म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थितीत ऑपरेशन यशस्वी झाले आहे. पोटातून फोन बाहेर काढण्यात आला आहे.
ऑपरेशन दरम्यान मुलीला दहा टाके पडले. तिची प्रकृती स्थिर आहे. लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेले डॉ.कुशवाह यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आमच्या कारकिर्दीत आम्हाला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले नव्हते. लहान मुलांना स्मार्टफोन देताना काळजी घ्यावी असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"