उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर बीएमडब्ल्यू कारसोबतचा फोटो पाहून एका मुलीने मुलाशी मैत्री केली. काही दिवसांच्या संवादानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागले. पुढे हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं. मात्र लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला.
मुलीला समजलं खरी परिस्थिती फार वेगळी आहे. मुलगा अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे आणि त्याच्याकडे ना बीएमडब्ल्यू आहे ना तो परदेशात नोकरी करतो. या फसवणुकीनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. ही बाब परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मुलगा ग्वाल्हेर येथील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली.
मैत्रीनंतर फोन आणि व्हिडीओ कॉल्स सुरू झाले. यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्नापूर्वी मुलाने सांगितलं होतं की, त्याच्याकडे बीएमडब्ल्यू आहे आणि तो कॅनडामध्ये काम करतो. तीन लाख रुपये पगार असल्याचं सांगितलं. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आलिशान कारसोबतचे फोटोही पोस्ट केले होते. अशा स्थितीत मुलीला वाटलं की तो खरं बोलत आहे.
मुलीने मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि लग्नानंतर तिचं आयुष्य सुखकर होईल असं तिला वाटलं. दोघांच्या घरच्यांच्या संमतीनंतर आठ महिन्यांपूर्वी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर मुलगी ग्वाल्हेरमध्ये तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा मुलाची पोलखोल झाली. सत्य बाहेर आल्यानंतर मुलगा नोकरीच्या बहाण्याने पळून गेला.
मुलीने आई-वडिलांच्या घरी आल्यानंतर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली. पोलिसांनी हा वाद कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवला. समुपदेशन केंद्रात मुलीने समुपदेशक डॉ. अमित गौर यांना स्पष्टपणे सांगितलं की, तिला आता मुलासोबत राहायचं नाही. सध्या याप्रकरणी समुपदेशकांनी पुढील तारीख दिली आहे.