ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 26 - काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक होण्याची घटना अजिबात नवीन नाही. यापूर्वी सुद्धा अऩेकदा जवानांवर दगडफेक झाली आहे. मात्र यावेळी कॉलेजमध्ये जाणारे तरुण-तरुणी या दगडफेकीमध्ये सहभागी झाले, ही चिंता वाढवणारी बाब आहे. याच दगडफेकीमध्ये सहभागी झालेल्या मुलीला देशासाठी फुटबॉल खेळण्याची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिलाभारताचे प्रतिनिधीत्व करायचे आहे.
मी जवानांवर दगड फेकले. पण मला असे करायचे नव्हते. मला राष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायचे आहे असे काश्मीरची पहिली महिला फुटबॉल कोच अफशाँ आशिकने सांगितले. ती 21 वर्षांची आहे. गर्व्हमेंट महिला कॉलेजमध्ये बीएच्या दुस-या वर्षाला शिकणारी अफशाँ तिच्या टीमसह सोमवारी सरावासाठी मैदानाच्या दिशेने जात होती.
त्यावेळी प्रताप पार्कजवळ काही मुले पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत असल्याचे तिला दिसले. तिने सोबत असलेल्या मुलींना धीरा दिला. तुम्ही घाबरु नका, आपण इथेच थांबू असे तिने सांगितले. त्याचवेळी पोलिस तिथे आले. आम्ही दगडफेक करतोय असा त्यांचा गैरसमज झाला. त्यांनी आमच्यापैकी एका मुलीच्या कानाखाली मारली. त्यामुळे आमचा संताप अनावर झाला आणि आम्ही दगडफेक सुरु केली असे आफशाँने सांगितले.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सांगतिले की, आम्ही प्रत्युत्तर देणार नाही असा मुलींचा समज झाला व त्यांनी दगडफेक सुरु केली. पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी शक्य तितका संयम पाळला. एकही विद्यार्थी जखमी झाला नाही हा त्याचा पुरावा आहे असे अधिका-याने सांगितले. मागच्या आठवडयात पुलवामा डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी दगडफेक केली होती.