कोलकाता, दि. 3 - चार वर्षाच्या चिमुरडीने नाणं गिळल्यानंतर जवळपास सात तासानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. नाणं गिळल्यानंतर चिमुरडीने भीतीपोटी कोणालाच सांगितलं नव्हतं. जेवताना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर मुलीने नाणं गिळल्यांच कुटुंबियांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. एक नाही तर चार रुग्णालयांमध्ये कुटुंबियांनी धाव घेतली. मात्र काहीतरी कारणं देत सर्वांनीच उपचारासाठी नकार दिला. अखेर सात तासानंतर मुलीला उपचार मिळाले अशी माहिती पालकांनी दिली आहे.
प्रियांका असं या चिमुरडीचं नाव आहे. बुधवारी घरच्या अंगणात खेळताना तिने चुकून एक रुपयाचं नाणं गिळलं होतं. मात्र भीतीपोटी तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. मुलीला त्रास होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पालकांनी तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेलं असता गळ्यात नाणं अडकल्याचं समोर आलं.
'आमच्या मुलीने नाणं गिळल्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं नव्हतं. पण जेव्हा ती जेवण्यासाठी नकार देऊ लागली तेव्हा मात्र आम्हाला शंका आली. यानंतर आम्ही तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र त्यांच्याकडे योग्य उपकरणं नसल्याने त्यांनी एम आर बांगूर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. बांगूर रुग्णालयात एक्स-रे काढून तपासणी केली असता तिने नाणं गिळल्याचं निष्पन्न झालं. पण त्यांच्याकडे बेड उपलब्ध नसल्याने नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगण्यात आलं', अशी माहिती प्रियांकाचे वडिल बप्पा यांनी दिली आहे.
नॅशनल मेडिकल कॉलेजमध्येही सुविधा नसल्याने त्यांना पुन्हा एनआरएस रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर बप्पा यांनी सेठ सुखलाल करनानी मेमोरिअल रुग्णालयात मुलीला भर्ती केलं. दुपारी तीन वाजता तिच्यावर उपचार करण्यात आले.
बप्पा यांनी रुग्णालयांमध्ये असणा-या असुविधांकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन त्यांनी चार रुग्णालयांमध्ये धाव घेतली, मात्र तिच्यावर उपचार न करण्याचं कारण सर्वांकडे होतं. प्रियांका सध्या सुखरुप असून चिंतेची कोणतीच गोष्ट नसल्याचं सेठ सुखलाल करनानी मेमोरिअल रुग्णालयाने सांगितलं आहे.