आसाम - आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या काही घटना या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशाच असतात. आसाममधील एका भाजीवाल्याचा आणि त्याच्या मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसामच्या तिनसुकियामध्ये घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजी विकणाऱ्या सोबरनची ही कथा आहे. 25 वर्षांपूर्वी सोबरन दैनंदिन कामकाजाप्रमाणे भाजी विकण्यासाठी निघाला. वाटेत त्याला रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक बाळ रडत असताना दिसले. त्याने, ते बाळ आपल्या घरी आणले. आज त्याच नकोशा मुलीमुळे भाजीवाल्याच्या अंधारल्या घरात नशिबाच्या ज्योती उजळवल्या आहेत.
सोबनर नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी निघाला होता. त्यावेळी, एका कचऱ्याच्या ढीगाऱ्याजवळ एक नवजात मुलगी त्याला दिसली. निर्दयी आईने नकुशी असलेल्या मुलीला उकंड्यावर टाकून दिले होते. मात्र, म्हणतात न, जिसका कोई नही होता, उसका खुदा होता आहे. या म्हणीप्रमाणे जणू त्या मुलीसाठी देवदूत बनून सोबरन आला. सोबरनने त्या चिमुकलीला आपल्या घरी नेले. त्यावेळी तो अविवाहित होता. मात्र, या चिमुकल्या परीवर त्याचा जीव जडला आणि त्याने तिचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला.
सोबररने या मुलीचे नाव ज्योती असे ठेवले. या मुलीला स्वत:चे नाव देऊन शिकून-सवरून मोठे केले. मुलीला कशाचीच कमतरता भासू नये म्हणून सोबरनने काबाडकष्ट केले. स्वत: गरिबीचे चटके सहन करत तिला शिकवले. तिच्या शिक्षणासाठी दिवसरात्र एक केला. काळ बदलला, दिवस पालटले आणि एका गरिब भाजीवाल्याची मेहनत फळाला आली. उकंड्याची दैना फिटते, असे आपल्याकडे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे उकंड्यात सापडलेल्या मुलीने भाजीवाल्या सोबरनच्या गरीबीची दैना फेडली. कारण, सोबरनला सापडलेली मुलगी अभ्यासात प्रचंड हुशार निघाली. तिने कॉम्प्युटर सायन्समधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर सन 2014 मध्ये आसामच्या लोकसेवा आयोगाची पीसीएस परीक्षा दिली. विशेष म्हणजे ज्योतीने सर्वांनाच थक्क करत या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यामुळे आसाम आयकर विभागाच्या सहायक आयुक्तपदी ज्योतीला नियुक्ती मिळाली. आपल्या लेकीचे यश पाहून सोबरनच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता, सोबरन त्याच्या ज्योतीसोबत सरकारी बंगल्यावर राहतो. सोबरनला जेव्हा विचारण्यात आले की, आज आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या पदावर पाहून तुम्हाला कसे वाटते? तेव्हा तो फक्त एवढेच म्हणाला की, त्यांच्या मुलीने त्यांच्या 25 वर्षांच्या कठोर परिश्रमाचे चीज केले आहे. सोबरनची ही कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. जी नक्कीच सर्वांना प्रेरणादायी आणि भावूक वाटत आहे. सोबरनच्या कष्टाला आणि ज्योतीच्या जिद्दीची ही कथा नक्कीच एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल, अशी प्रेरणादायक आहे.