आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील शाहगंजमध्ये मंगळवारी रात्री एक विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर निघालेल्या वरातीत फतेहपूर सिक्रीहून आलेली एक तरुणी पोहोचली. आपण नवऱ्या मुलाची प्रेयसी असल्याचा दावा करत तिनं गोंधळ घातला. नवऱ्यानं दावा फेटाळताच तिनं विष खाण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी तिला रोखलं. हा गोंधळ पाहून नवरीच्या मामांनी धसका घेतला. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
शाहगंजमध्ये मंगळवारी रात्री फतेहपूर सिक्रीहून लग्नाची वरात आली. आनंदाचं वातावरण होतं. तितक्यात ताजगंजला वास्तव्यास असलेली एक तरुणी तिथे पोहोचली. नवऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा दावा तरुणीनं केला. दोघेही एकाच हॉटेलमध्ये काम करायचो. तिथेच दोघांची ओळख झाली. तरुणानं लग्नाचं वचन दिलं होतं आणि आता तो दुसऱ्या तरुणीशी लग्न करत असल्याचं तरुणीनं म्हटलं.
नवऱ्या मुलानं विश्वासघात केल्याचं म्हणत तरुणीनं गोंधळ घातला. याची माहिती वधूपक्षाला मिळाली. त्यामुळे गदारोळ आणखी वाढला. तरुणी स्वत:सोबत पोलिसांनादेखील घेऊन आली होती. माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही, असं तरुणीनं नवऱ्या मुलाला विचारलं. त्यावर त्यानं नाही असं उत्तर दिलं. यानंतर तरुणीनं विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तिला रोखलं. रात्री १ वाजेपर्यंत हा संपूर्ण प्रकार सुरू होता.
लग्नात सोहळा सुरू होण्यापूर्वी झालेला गोंधळ पाहून नवरीच्या मामाची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र धसक्यामुळे त्यांनी जीव सोडला. बुधवारी दोन्ही बाजूंनी संवाद झाला आणि प्रकरण मिटलं. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करू, अशी माहिती सर्कल ऑफिसर सौरभ सिंह यांनी दिली.