इंदौर - प्रेयसीनं लग्नाला नकार दिला म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने पाच लाख रुपयांच्या नोटा पेटवून दिल्याची घटना मध्यप्रदेशातील सीहोरमध्ये घडली आहे. जितेंद्र गोयल असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात अटक केलं आहे. आग लावलेल्या रकमेत दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश होता. त्याच्याकडून 46 हजार रुपयेही जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र गोयल स्पंदना स्फूर्ती फायनान्स कंपनीत कॅशिअर म्हणून काम करत होता. त्याच्याकडेच या तिजोरीची चावी असायची . कंपनीच्या तिजोरीतून सहा लाख 74 हजार रुपये काढून जितेंद्र गायब झाला. कंपनीच्या मॅनेजरच्या तक्रारीनंतर नसरुल्लागंज पोलिसांनी कॅशिअर जितेंद्रविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपी जितेंद्र कंपनीची सहा लाख 74 हजार रुपयांची रक्कम प्रेयसीला दाखवण्यासाठी बेरावल या गावात गेला होता. जेणेकरुन पैसे पाहून ती त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होईल. पण प्रेयसीचे लग्न दुसरीकडे ठरले होते. त्यामुळे तिने जितेंद्रसोबत लग्न करण्यास नकार दिला. याच कारणामुळे नाराज झाल्याने त्याने त्याच्याजवळ असलेल्या पाच लाख रुपयांच्या नोटा पेटवून दिल्या.