पूर्वी सिंहभूम: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. झारखंडच्या घाटशिलामधल्या नुतनडीहच्या क्वारंटिन केंद्रात सध्या याचीच प्रचिती येत आहे. या क्वारंटिन केंद्रात एका प्रेमी युगुलाला ठेवण्यात आलं आहे. हे दोघं दिवसभर एकमेकांना पाहत राहतात. प्रेमाच्या गोष्टी करतात. त्यांच्या शेजारी अनेक प्रवासी मजूर आहेत. मात्र त्यामुळे प्रेमी युगुलाला कोणतीही अडचण होत नाही. आंध्र प्रदेशमध्ये कामासाठी गेलेला प्रियकर माघारी परतला असून त्याला क्वारंटिन केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती प्रेयसीला मिळाली. गावात राहणाऱ्या प्रेयसीनं लगेचच क्वारंटिन केंद्र गाठलं. या दोघांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांचं लग्न व्हावं, असं दोन्ही कुटुंबांना वाटत नाही. प्रेयसीच्या कुटुंबियांनी क्वारंटिन केंद्र गाठून दोघांनाही बरंच सुनावलं. त्यानंतर प्रेमी युगुल क्वारंटिन केंद्र सोडून पळून गेलं. मात्र दुसऱ्याच दिवशी ते परतलं. त्यानंतर ग्रामस्थांच्या सांगण्यावरून प्रेयसीलादेखील क्वारंटिन केंद्रात ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच घाटशिलाचे बीडीओ, एसडीओ आणि एसडीपीओ यांनी क्वारंटिन केंद्र गाठलं. त्यांनी प्रेमी युगुलाची माहिती घेतली. संपूर्ण प्रकरण क्वारंटिन केंद्राशी संबंधित असल्यानं परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आल्याचं बीडीओ संजय कुमार दास यांनी सांगितलं. नूतनडीह क्वारंटिन केंद्रात सध्या २२ जण आहेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटिनमध्ये राहण्यास सांगितलं होतं. मात्र ग्रामस्थ गावात प्रवेश देत नसल्यानं मजुरांना क्वारंटिन केंद्रात ठेवण्याच आल्याची माहिती त्यांनी दिली.मूळचा नूतनडीहचा रहिवासी असलेला चंद्रमोहन हांसदा आणि त्याची प्रेयसी यांनी दोनच वर्षांपूर्वी गुपचूप लग्न केल्याची माहिती दास यांनी केलेल्या चौकशीतून पुढे आली. त्या दोघांना सोबत राहण्याची इच्छा आहे. मात्र कुटुंबीय तयार नाहीत. त्यामुळे सध्या ते क्वारंटिन केंद्रात एकत्र राहत आहेत.
CoronaVirus News: बाबो! प्रियकरासोबत राहण्यासाठी प्रेयसीनं सोडलं घर, गाठलं क्वारंटिन सेंटर; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:48 PM